महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 18:23 IST2025-10-22T18:22:29+5:302025-10-22T18:23:29+5:30
मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजपा स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
मुंबई - ऐन दिवाळीत राज्यात राजकीय फटाके फुटू लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडला भाजपा स्वबळावर लढणार आहे. जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळे लढू. मुंबईत मात्र महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजपा स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. मुंबईत एकत्र पण राज्यात वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार आहोत. लोकसभेला महाविकास आघाडीचा कसा फायदा झाला, त्याचे पुरावे देणार असं फडणवीसांनी म्हटलं.
सोबतच दिल्लीत जाण्याच्या चर्चेवरही फडणवीस यांनी भाष्य केले. सध्या तरी मी वर्षावरच राहणार आहे. दिल्लीत जाण्याबाबत २०२९ नंतर बघू असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. ठाकरे बंधू एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील अशी चर्चा आहे. त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता मुंबईत महायुती म्हणूनच लढण्याचा भाजपाचा विचार आहे. त्याशिवाय मुंबई महापालिकेवर युतीचा महापौर असेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांना कुठलाही फायदा होऊ नये यादृष्टीने महायुती रणनीती आखत आहे. त्यात मुंबईत एकत्र लढू पण इतर महापालिकांमध्ये ताकद पाहून वेगळे लढण्याची भूमिका घेऊ असं फडणवीसांनी म्हटले. एकीकडे महायुतीबाबत भाजपाची भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतही काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस महापालिका निवडणूक लढणार नाही असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं होते. जगताप यांच्या विधानावरून काँग्रेस स्वबळावर लढण्याची चिन्हे दिसून येत आहे. परंतु शिवसेना-मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं जगताप म्हणाले. परंतु ही माझी वैयक्तिक भूमिका असून पक्षाचा निर्णय अंतिम असेल असं जगताप यांनी स्पष्ट केले आहे.