एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:48 AM2019-12-21T10:48:18+5:302019-12-21T11:36:18+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Will Eknath Khadse enter NCP? Sharad Pawar says ... | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; शरद पवार म्हणतात...

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; शरद पवार म्हणतात...

Next

औरंगाबादः गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपानं तिकीट कापल्यापासून एकनाथ खडसे भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच खडसे राष्ट्रवादी जाणार असल्याचंही बोललं जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर खडसेंनी नागपुरात येऊन शरद पवारांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा खडसे भाजपा सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपवर नाराज असलेल्या व गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात राज्यातील नेतृत्वावर तोफ डागणाऱ्या खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची गुप्त भेट घेतली होती. 

विशेष म्हणजे खडसेंनी भेट घेतल्याच्या वृत्ताला शरद पवारांनीही दुजोरा दिला आहे. खडसे मला भेटून गेले त्यात काहीच शंका नाही. त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली, पण खडसेंचं समाधान करण्याएवढी साधनसामग्री माझ्याकडे नाही, असंही पवार म्हणाल्यानं अनेक शंका-कुशंकांना व्यक्त केल्या जात आहेत.  तत्पूर्वी नागपुरात दाखल झाल्यानंतर खडसेंनी भाजपा सोडणार नसल्याचंही म्हटलं होतं. मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र, गेल्या 5 वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पंकजा पक्ष सोडून जाणार नाही, माझं सोडून द्या, असे म्हणत बंडखोरी होण्याची शक्यता त्यांनी सूचवली होती. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार की पक्षातच राहणार? हे येत्या काळात समजणार आहे. याच, पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
 
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असले तरी त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क सुरू आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये महाराष्ट्रात सर्वांनीच उत्तम काम केले आहे. मात्र, सर्वांच्याच मनासारखे होईल, असे नसते. आपल्या मनाविरुद्ध काही घडले असले तरी कार्यरत राहणे हीच भाजपाची शिकवण आहे. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना यासंदर्भात सर्व काही कल्पना आहे. त्यामुळे पक्षाची चौकट ते मोडणार नाहीत, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Web Title: Will Eknath Khadse enter NCP? Sharad Pawar says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.