बारामतीत एकत्र येणार की नाही! स्नेहभोजनावेळी काय घडले? पवारांची बहीण सरोज पाटलांनी दिले मोठे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 14:54 IST2023-11-10T14:53:45+5:302023-11-10T14:54:27+5:30
Ajit pawar -Sharad Pawar Meet: शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत. रक्षाबंधनाला अजित पवार कार्यक्रमाला आले नव्हते. यामुळे दिवाळी आणि भाऊबीजेला येणार का असा प्रश्न राज्यभरातील कार्यकर्त्यांना पडला होता.

बारामतीत एकत्र येणार की नाही! स्नेहभोजनावेळी काय घडले? पवारांची बहीण सरोज पाटलांनी दिले मोठे संकेत
गेल्यावेळी रक्षाबंधनाला एकत्र येण्याचे अजित पवारांनी टाळले होते. परंतू, आज अजित पवार हे शरद पवारांसोबत पुण्यात पवार कुटुंबाच्या दिवाळी स्नेहभोजनाला एकत्र आले होते. काका-पुतण्यामधील आलेले वितुष्ट दिवाळी दूर करते का, असा प्रश्न उपस्थित होत असताना प्रतापराव पवारांच्या घरी नेमके काय घडले ते शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी बाहेर पडताना सांगितले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली का असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता सरोज पाटील यांनी कुटुंबाच्या गप्पा रंगल्या होत्या, असे सांगितले. आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या असे त्यांनी सांगितले.
आता आणखी पाच दिवसांनी भाऊबीज आहे, पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र येणार का, असा सवाल त्यांना विचारला असता त्यांनी बारामतीला एकत्र येणार नाही, मी कोल्हापूरला निघाले, असे त्यांनी सांगितले. अजित पवारांची तब्येतही बरी असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत. रक्षाबंधनाला अजित पवार कार्यक्रमाला आले नव्हते. यामुळे दिवाळी आणि भाऊबीजेला येणार का असा प्रश्न राज्यभरातील कार्यकर्त्यांना पडला होता. आज सकाळी १२ च्या सुमारास अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे दोघे बाणेरला पोहोचले. त्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे बाणेरला पोहोचले होते.
अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे. अजित पवारांनी भर सभेत शरद पवारांच्या वयाचा प्रश्न काढला होता. तसेच शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका केली होती. यामुळे सुरुवातीला शरद पवारांचीच फूस असल्याचे वाटत असलेले बंड आता आमदारकी-खासदारकीच्या अपात्रतेपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सुप्रिया सुळेंच्या खासदारकीविरोधात अजित पवार गटाने अपिल केले आहे.