बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:40 IST2025-11-24T14:38:54+5:302025-11-24T14:40:59+5:30
Maharashtra Local Body Election 2025: सध्या तरी स्थानिक मुद्यांपेक्षा असेच मुद्दे चर्चेत आहेत.

बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांवरून विरोधक महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीवर टीका करत आहेत. यातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत असल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र आहे. यातच आता बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर प्रभाव पडेल, असा दावा केला जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा धसका विरोधकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे या निकालांमुळे सत्ताधारी निश्चिंत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
बिहार निकालाचा प्रभाव राज्यात?
नगरपालिका निवडणूक म्हणजे रस्ते, नाल्या, पथदिवे, स्वच्छता अशा मूलभूत विषयांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी. पण अलीकडच्या काळात पक्षीय राजकारण थेट घराघरांपर्यंत पोहोचले असल्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या मुद्यांचीच चर्चा अधिक व्हायला लागली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना बिहारचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसेल असा व्यक्त केलेला आशावाद त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. २०४७पर्यंत भाजप सत्तेत राहील असे ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होतेच. त्यामुळे भाजपचे उमेदवार कदाचित निश्चिंतही असतील. आता त्याचा फायदा विरोधक घेतात की तेही बिहारच्या निकालाचा धसका घेऊन लढण्यापूर्वी पराभूत होतात यावरच पालिका निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे. सध्या तरी स्थानिक मुद्यांपेक्षा असेच मुद्दे चर्चेत आहेत. त्यामुळे निवडणूक स्थानिक की राष्ट्रीय असा प्रश्न पडला तर नवल ते काय?
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचे वादळ उठले आहे. महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची तयारी वेगाने पुढे सरकत आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धवसेना, काँग्रेस आणि मनसेची एकत्रित बैठक झाली. यात काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार दिला असला तरी इंडिया आघाडीबरोबर स्थानिक पातळीवर आघाडी होऊ शकते, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.