why Uddhav Thackeray reminds BJP of 1999 assembly election; exactly what happened? | भाजपाचा प्रयत्न फसला होता अन् पुढची १५ वर्षं आघाडीचं सरकार होतं; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
भाजपाचा प्रयत्न फसला होता अन् पुढची १५ वर्षं आघाडीचं सरकार होतं; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून अखेरच्या दिवसापर्यंत महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. खरे-खोटेपणावरून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्र्य़ांच्या आरोपांना उत्तर देताना ठाकरे यांनी भाजपाला 1999 ची आठवण करून दिली आहे. 


1995 मध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार होते. मात्र, 1999 मध्ये मध्यावधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी लढूनही युतीपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर विदेशी असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी वेगळी चूल मांडली होती. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्याने या पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती. या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. निकालानंतर काँग्रेसला 75, राष्ट्रवादीला 58 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेना आणि भाजपाने आघाडी केली होती. शिवसेनेला 75 तर भाजपाला 58 जागा मिळाल्या होत्या. युतीचीच सत्ता असल्याने भाजपाच्या नेत्यांना आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास होता. मात्र, युती सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरली आणि हीच वेळ काँग्रेस राष्ट्रवादीने साधली. 


युतीच्या 125 तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मिळून 133 जागा होत होत्या. मात्र, पवारांच्या आरोपांमुळे दोन्ही पक्षांत आलेली कटुता पाहता भाजपा-सेनेच्या नेत्यांना संधी वाटत होती. मात्र, ते अपयशी ठरले. ही संधी साधत काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. ही आघाडीची सत्ता पुढे 15 वर्षे टिकली. याच घटनेची आठवण उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांना करून दिली आहे. भाजपाचा प्रयत्न फसला होता अन् पुढची १५ वर्षं आघाडीचं सरकार होतं; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरें यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिले. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री खोटे बोलत असल्याचे सांगत जोपर्यंत ते मान्य करत नाहीत तो पर्यंत चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी फोन का उचलले नाहीत याचेही कारण सांगत लोकसभेवेळचा अमित शहा आणि फडणवीस यांच्यासोबतचा चर्चेचा तपशीलही सांगितला आहे. 

Web Title: why Uddhav Thackeray reminds BJP of 1999 assembly election; exactly what happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.