वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:20 IST2025-12-13T12:17:36+5:302025-12-13T12:20:45+5:30
महाराष्ट्र अखंड राहावा, एकसंध राहावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सहमती आहे. काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचे राजकारण आहे असा घणाघात संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला होता.

वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
नागपूर - संजय राऊत कुणाला महत्त्व देत नाही हा त्यांचा विषय, आम्ही कुठे फार त्यांना महत्त्व देतो. संजय राऊत हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही पाहू. संजय राऊतांना मी महत्त्व का देऊ असं सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राऊतांवर निशाणा साधला. वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून उद्धवसेनेने विरोध केला. त्यावर संजय राऊतांनी भाजपासह काँग्रेसवरही निशाणा साधला. त्याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवारांनी राऊतांवर घणाघात केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आघाडी असेल तर आमची चर्चा होते. तो निवडणूक लढण्याचा विषय आहे. मात्र एकमेकांना महत्त्व देण्याचा विषय नाही. आमचे वैचारिक मतभेद आहेत. त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. वेगळ्या विदर्भाची भूमिका मी का मांडतोय, याचे कारण आधी सांगितले आहे. विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे न्याय मिळाला असं नाही. विदर्भाला काय दिले, ७५ हजार कोटींच्या मागणीत विदर्भ कुठे आहे? एकीकडे समतोल विकासाच्या बाता करायच्या आणि विदर्भाला काही द्यायचे नाही. केवळ घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच सुरू नाही. आजही विदर्भातील मुलांचे स्थलांतरण सुरू आहे. कामासाठी बाहेर जावे लागते. विदर्भात दरवर्षी ३-४ जिल्ह्यातून लाखभर मजूर आंध्र प्रदेश, तेलंगणात जातो. ११ वर्षाच्या कारकिर्दीत भाजपा सरकारनं काय दिवे लावले? त्यामुळे विदर्भाची काय व्यथा आहे हे संजय राऊतांना माहिती नाही असं त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मुंबई, विदर्भ तोडण्याचा डाव सुरू आहे. पालघरमध्ये गुजरातची घुसखोरी सुरू आहे. फडणवीस सरकार गुजरातचे मिंधे आहेत. या सरकारमधील महत्त्वाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वेगळ्या विदर्भाची भाषा करतात. केंद्रातील सरकार वेगळा विदर्भ, मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राने डोळ्यात तेल घालून याकडे लक्ष ठेवले पाहिजे. वेगळ्या विदर्भासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जी भूमिका मांडली आम्ही त्याला फार महत्त्व देत नाही. यापूर्वीही काँग्रेस आणि आमचा यावर वाद झाला आहे. महाराष्ट्र अखंड राहावा, एकसंध राहावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सहमती आहे. काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचे राजकारण आहे असा घणाघात संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला होता.
त्यासोबतच भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या भूमिकेवर ते एकसाथ आहे. त्यामुळे कुणी महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते स्वप्नभंग होईल असा इशाराही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.