"आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?"; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:15 IST2025-03-27T18:13:02+5:302025-03-27T18:15:05+5:30
Uddhav Thackeray Saugat E Modi Kit: सौगात ए मोदी किट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बावनकुळेंनी ठाकरेंवर हल्ला चढवला.

"आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?"; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल
Saugat E Modi Kit News Marathi: 'सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे त्याचे एक उदाहरण आहे, असे म्हणत शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे आता औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री असताना जनतेला काय दिले? असा उलट सवाल बावनकुळेंनी ठाकरेंना केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे की, "हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला. आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले", अशा शब्दात ठाकरेंना डिवचले.
ही विकासाची गॅरंटी
"आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही. भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला", बावनकुळे ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले.
त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडली -बावनकुळे
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही", असे टीकेचे बाण बावनकुळेंनी ठाकरेंवर डागले.
हेही वाचा >>"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका
"गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत", असे म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे म्हणालेले, हा पुरणपोळी देण्याचा प्रकार
भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सौगात ए मोदी किटवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणालेले, "महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देणारे आता भेट देताहेत. आयुष्यभर मुस्लीम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यावर त्यांना पुरणपोळी द्यायची असाच हा प्रकार आहे. काही उडाणटप्पू आहेत, ते टोपी घालून कशी सौगात घेऊन जातत, ते मला बघायचं आहे", असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावलेला.