मराठी पुस्तके खपत का नाहीत? अकादमी विजेत्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:46 IST2025-06-19T13:43:55+5:302025-06-19T13:46:27+5:30

Marathi Books: राज्यात १६ हजार शासकीय ग्रंथालये आहेत. मग...

Why are Marathi books not being consumed? Academy winner's regret | मराठी पुस्तके खपत का नाहीत? अकादमी विजेत्याची खंत

मराठी पुस्तके खपत का नाहीत? अकादमी विजेत्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी भाषा व्यवहार १२ कोटी लोकांशी संबंधित आहे. राज्यात १६ हजार शासकीय ग्रंथालये आहेत. मग मराठी साहित्यातील पुस्तकांचा हवा तसा खप का होत नाही. ५०० पुस्तकांची आता तर ३०० पुस्तकांची एक आवृत्ती निघते, अशी खंत साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक प्रदीप कोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर या छोट्याशा गावातील असलेले आणि सध्या मुंबईत वडाळा येथे राहणारे प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या ‘लोकवाङ्मय गृह’ने प्रकाशित केलेल्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. संवेदनशील कवी मनाच्या तरुणाचे उमेदवारीचे दिवस रेखाटणारी, तसेच महानगरातील वास्तव मांडणारी ही कादंबरी आहे.

...म्हणून लेखकांना नैराश्य येते, लेखन थांबते
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत माझ्यासारख्या गावातून आलेल्या लेखकांना पटकन ओळख मिळत नाही. साहित्यविश्वात पुरेशी स्पेस, तसेच प्रोत्साहन मिळत नाही. त्यातून युवा लेखकांना नैराश्य येते आणि त्यांचे लेखन थांबते. सुदैवाने माझ्याबाबत असे झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. या पुरस्काराने मला रेक्गनिशन मिळाले आहे. अर्थात त्यामुळे माझी जबाबदारीही वाढली आहे. माझ्या घरात अक्षराशी ओळख झालेला, तसेच दहावी झालेली मी गावातील पहिली व्यक्ती होतो. बारावीनंतर मी मुंबईत आलो. तरुण वयात साहित्यिकाचे कौतुक झाले तर एक सशक्त साहित्यिक घडण्यास हातभार लागतो, असे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक, प्रदीप कोकरे म्हणाले.

बालसाहित्य माणूस घडविण्याची पायरी
नांदेड : साहित्य अकादमीचा यंदाचा 'बाल वाङ्मय पुरस्कार' नांदेड येथील डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. चांगले बालसाहित्य ही चांगला माणूस घडविण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी असते. ही पायरी भक्कम असली पाहिजे, कारण आजच्या गढूळ आणि मूल्यहीन होत चाललेल्या वातावरणात बालसाहित्याची जबाबदारी अधिकच वाढली आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश सावंत यांनी दिली. आजच्या प्रदूषित सामाजिक वातावरणात माणसाचे यंत्र बनत चालले आहे. माणसाचे यंत्र होऊ द्यायचे नसेल, तर बालकांच्या हातात योग्य वयात योग्य ते पुस्तक देणे अत्यावश्यक आहे. ही गरज ओळखून मी निष्ठेने बालसाहित्याचे लेखन करत आलो आहे. 

Web Title: Why are Marathi books not being consumed? Academy winner's regret