कांदा कोणाला रडवणार, ऐन दिवाळीत बफर साठा येणार, परदेशातून फक्त १० टक्के मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:41 IST2025-10-14T15:41:20+5:302025-10-14T15:41:43+5:30
या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बंफर स्टॉक उपलब्ध होणार असल्याने भाव कोसळू शकतात, असे कांदा निर्यातदारांनी सांगितले.

कांदा कोणाला रडवणार, ऐन दिवाळीत बफर साठा येणार, परदेशातून फक्त १० टक्के मागणी
नाशिक : प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे. कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी आधीच सुरू झाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधूनही खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बंफर स्टॉक उपलब्ध होणार असल्याने भाव कोसळू शकतात, असे कांदा निर्यातदारांनी सांगितले.
खरीप पीक उशिरा येणार
उशिराचा खरीप कांदा पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे, कर्नाटकमधून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवठा सुरू राहील. जुन्या रब्बी साठ्याची नियमित आवक आणि नवीन खरीप पीक यामुळे यावर्षी कांद्याची कमतरता भासणार नाही.
परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी
सध्या उन्हाळ कांद्याला ९०० ते ९७५ रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यात अजून भाव कमी झाले तर कांदा बाजारात अत्यंत अवघड स्थिती होईल.
दुसरीकडे परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे, ज्यामुळे निर्यातीला वाव नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले.
कांदा बियाण्यांची निर्यातच शेतकऱ्यांच्या मुळावर
कांदा निर्यातदार असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी केंद्र सरकारला कांदा बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
बांगलादेश, श्रीलंका आणि इतर
शेजारी देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून कांद्याचे उत्पादन
करत आहेत.
चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे, जी दीर्घकाळात भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी संकट निर्माण करू शकते.