कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 05:30 IST2025-11-24T05:29:59+5:302025-11-24T05:30:17+5:30
सेवाज्येष्ठतेनुसार १९९० च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग आता सात नावांपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवेल आणि त्यानंतर राज्य सरकार त्यातील एकाची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करेल. जी सात नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत, त्यात सदानंद दाते यांच्याशिवाय पोलिस महासंचालक (विधी व तांत्रिक) संजय वर्मा, गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीव कुमार सिंगल, पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण) अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे संचालक संजीव कुमार, पोलिस महासंचालक (रेल्वे पोलिस) प्रशांत बुरडे यांचा समावेश आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार १९९० च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. २६/११ हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे आणि सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर एनआयएचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
एक महिन्यासाठी बनले होते संजय वर्मा डीजी
फोन टॅपिंगच्या आरोपांतून मुक्त झालेल्या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य पोलिस दलातील ४८ व्या आणि पहिल्या महिला पोलिस महासंचालक आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान रश्मी शुक्ला यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आले. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय वर्मा यांना निवडणुकीच्या काळात एक महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकानंतर पुन्हा महासंचालकपदाची सूत्रे शुक्ला यांच्या हातात देण्यात आली.
दाते कडक शिस्तीचे
कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दाते यांनी मुंबईसह आणि केंद्रात महत्त्वाच्या, संवेदनशील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या आहेत. मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे), राज्य दक्षतवादविरोधी पथकाचे प्रमुख पदही त्यांनी हाताळले आहे.
दाते सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर
केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या दाते यांना राज्यात पोलिस महासंचालक म्हणून आणायचे असेल तर, तशी विनंती राज्य सरकारला केंद्राकडे करावी लागणार आहे. दाते यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. मात्र, जर त्यांना डीजीपी म्हणून नियुक्त केले गेले तर त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकेल.