कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच
By यदू जोशी | Updated: December 19, 2025 05:31 IST2025-12-19T05:30:53+5:302025-12-19T05:31:24+5:30
विदर्भाकडून सर्वात जास्त अपेक्षा

कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच
यदू जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: विविध महापालिकांमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची बैठक २५ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. त्या दिवशी बहुतेक उमेदवार नक्की केले जातील. कोणत्या पक्षाशी युती करायची याचे अधिकार प्रदेश काँग्रेसने स्थानिक पातळीवर दिले आहेत. निधीची चणचण भासत असलेल्या या पक्षाला निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच करा, असे सांगण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक महापालिकेसाठी प्रदेश काँग्रेसने नेमलेले प्रभारी आणि तेथील शहर/जिल्हाध्यक्ष या दोघांना मुंबईत २५ ला बोलविले असून, प्रत्येक महापालिकेत स्थानिक पातळीवर ठरविण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांना राज्य निवड मंडळ मान्यता देईल. निवड मंडळाच्या सूचनेनुसार काही बदलदेखील केले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
स्वबळाचेच संकेत
महापालिका निवडणुकीत बहुतेक ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. काही महापालिकांमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन
आघाडीशी आघाडी केली जाणार आहे. इचलकरंजी या नवीन महापालिकेत विविध पक्ष, संघटना स्थानिक पातळीवर एक आघाडी करण्याच्या तयारीत असून, काँग्रेस त्यात सहभागी होऊ शकते; पण त्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही.
गेल्यावेळचे यश टिकवण्याचे आव्हान
गेल्यावेळच्या महापालिका निवडणुकीत मिळाले तेवढे यशही काँग्रेस यावेळी मिळवू शकणार का, हा पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. नांदेडमध्ये ८१ पैकी ७३ जागा पक्षाने अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात जिंकल्या होत्या.
त्यानंतर अनेक नगरसेवक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. अनेक महापालिकांमध्ये काँग्रेसकडून जिंकलेले नगरसेवक भाजप वा शिंदेसेनेत गेले. उल्हासनगर १, ठाणे ३, नाशिक ६, पनवेल २, पिंपरी चिंचवड ०, पुणे ९, जळगाव ०, वसई विरार ०, कल्याण ३, पनवेल २ अशा नीचांकी जागा काँग्रेसला गेल्या महापालिका निवडणुकीत मिळाल्या होत्या.
अस्तित्वासाठी लढा
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, जालना, कोल्हापूर या महापालिकांमध्ये चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. कोकणात काँग्रेसचा अस्तित्वासाठी लढा असल्याचे चित्र आहे.
रसद झाली बंद
पूर्वी प्रदेश काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात 'रसद' पोहोचविली जायची. मात्र, आज आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षात जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नेते आहेत ते आपापल्या प्रभावक्षेत्रात खर्चाची जबाबदारी उचलतात.
प्रदेश काँग्रेससाठी म्हणून पूर्वी ज्या पद्धतीने राज्यातील मोठे नेते मदत करायचे ते आता जवळपास बंद झाले आहे. प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की असे असले तरी प्रदेश काँग्रेसकडून काही प्रचारसाहित्य प्रत्येक महापालिकेतील काँग्रेस उमेदवारांना पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.