नगराध्यक्ष कोण असावे? भाजपची ३-३ नावे तयार; घोषणेआधीच सोपविली प्रदेशाध्यक्षांकडे यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:39 IST2025-11-05T12:39:22+5:302025-11-05T12:39:47+5:30
निवडणूक घोषणेआधीच भाजपने तयारीला वेग दिला

नगराध्यक्ष कोण असावे? भाजपची ३-३ नावे तयार; घोषणेआधीच सोपविली प्रदेशाध्यक्षांकडे यादी
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावे भाजपने तयार ठेवली आहेत. गेल्या तीन दिवसांत प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी तीन-तीन नावे लिफाफ्यात बंद करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली आहेत.
निवडणूक घोषणेआधीच भाजपने तयारीला वेग दिला. शनिवार, रविवार व सोमवारी प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांत पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांना पाठविण्यात आले. भाजपची प्रत्येक शहरात ६१ जणांची (विविध आघाड्यांच्या अध्यक्षांसह) कार्यकारिणी आहे. हे ६१ जण आणि त्या शहराचे रहिवासी असलेले जिल्हा पदाधिकारी, महापालिका पदाधिकारी यांची ‘वन टू वन’ चर्चा करून नगराध्यक्षपदाचे योग्य उमेदवार कोण, हे या निरीक्षकांनी जाणून घेतले.
कोणाला संधी द्यावी? युती करायची की नाही? नगरसेवक म्हणून कोणाला संधी दिली पाहिजे? निवडणुकीसाठी कुठली रणनीती असली पाहिजे? नगरपालिका निवडणुकीत मित्रपक्षांशी (शिंदेसेना आणि अजित पवार गट) युती करायची की नाही? युती केली तर दोन पक्षांना कसे सामावून घ्यायचे आणि युती करायची नसेल तर स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने आपली काय तयारी आहे, हेही जाणून घेण्यात आले.
लगेच होणार सर्वेक्षण
प्रत्येक नगरपालिकेच्या शहरातून घेतलेल्या तीन-तीन नावांविषयी मतदारांमध्ये काय भावना आहे. त्या तिघांपैकी कोण क्रमांक एकला आहे, याबाबत प्रदेश भाजपकडून दोन-तीन दिवसांत सर्वेक्षण केले जाणार आहे. या तीन नावांव्यतिरिक्त एखादी प्रभावी व्यक्ती योग्य उमेदवार ठरू शकते काय, हेही शोधले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपमध्ये सक्रिय नाही; पण समाजात मोठ्या प्रमाणात मान्यता आहे, अशा व्यक्तींना उमेदवारी देण्यावरही विचार केला जाणार आहे.