अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:08 PM2023-11-23T16:08:47+5:302023-11-23T16:09:30+5:30

अहमदनगरच्या नेवासा इथं मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले होते.

Who is the duplicate Manoj Jarange Patil who came to Ahmednagar Sabha?; Even the Maratha protesters were stunned | अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले

अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले

अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यापासून राज्यभर रान उठवणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी जालनातील अंतरवाली सराटी येथे ते उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला राज्यभरात पाठिंबा मिळाला आणि पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई नव्याने सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात मराठा युवकांमध्ये आहेत. कुणी त्यांचे चित्र काढतंय तर कुणी दिवाळीत रांगोळी काढतंय. पण अहमदनगरच्या आजच्या सभेत चक्क मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा हुबेहुब दिसणाऱ्या चेहऱ्याने अनेकांना थक्क केले. 

अहमदनगरच्या नेवासा इथं मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले होते. त्यावेळी नेवासातील एक व्यक्ती सभास्थळी आला. सुरुवातीला त्याला पाहून मनोज जरांगे पाटीलच आल्याचा भास आंदोलकांना झाला. परंतु ही व्यक्ती मनोज जरांगे पाटील नव्हती तर मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी याठिकाणी आली होती. या व्यक्तीचे नाव रामेश्वर धोंगडे असं आहे. ते धनगर समाजातील असून मराठा आरक्षणाच्या लढाईत पाठिंबा देण्यासाठी ते आज सभास्थळी आले होते. धोंगडे यांना पाहून सभास्थळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अनेकांनी रामेश्वर धोंगडे यांच्यासोबत फोटोही काढले. 

याबाबत माध्यमांशी रामेश्वर धोंगडे म्हणाले की, मला खूप अनुभव आले. मी धनगर समाजाचा असलो तरी मराठा समाजाच्या या लढाईत मीदेखील उतरलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही धनगर समाजाचीही भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दिसत असल्याने जिथे जाईल तिथे माझ्यासोबत फोटो घेतात. २ दिवसांपूर्वी मी पंढरपूर येथे गेलो होतो. तेव्हा एका वयोवृद्ध शेतकऱ्यांना माझे पाय पकडून दर्शन घेतले असा अनुभव आल्याचा किस्सा त्यांनी ऐकवला. जोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. जरांगे पाटील यांना भेटण्याची खूप इच्छा होती. आजपर्यंत मी भेटलो नाही. आरक्षणाचा लढा थांबणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर निशाणा 
भुजबळांना सरकारने पाठबळ दिले असावे किंवा भुजबळांना भाजपाकडून ऑफर आली असावी. गृहमंत्रीही काही बोलत नाहीत. भुजबळांना थांबवतही नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारायच्या सरकारने ठरवलंय का अशी शंका आमच्या मनात आली आहे. भुजबळांना पलट्या मारायची सवय आहे. मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करण्यासाठी सरकारने त्यांना फूस लावली आहे का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 
 

Web Title: Who is the duplicate Manoj Jarange Patil who came to Ahmednagar Sabha?; Even the Maratha protesters were stunned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.