अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:38 IST2025-01-08T14:36:06+5:302025-01-08T14:38:15+5:30

NCP News: शरद पवार गटातील काही खासदारांना फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता शरद पवार गटातील खासदार अमर काळे यांनी अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी संपर्क साधणाऱ्या नेत्याचं नावच उघड केलं आहे. 

Who contacted Ajit Pawar for joining the group? Sharad Pawar's MP Amar Kale directly revealed the name | अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं

अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही उलथापालथ होईल, धक्कादायक घडामोडी घडतील असे दावे केले जात आहेत. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. काही नेत्यांच्या सूचक विधानांमुळे या चर्चांना बळही मिळत आहे. दरम्यान, शरद पवार गटातील काही खासदारांना फोडून आपल्या गटात आणण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न सुरू असल्याचे आणि त्यासाठी खासदारांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता शरद पवार गटातील वर्धा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी संपर्क साधणाऱ्या नेत्याचं नावच उघड केलं आहे. 

सुरुवातीला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील आमदारांशी संपर्क साधल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र सुनील तटकरे यांनी हे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर आता खासदार अमर काळे यांनी शरद पवार गटातील खासदारांशी पक्षप्रवेशासाठी संपर्क साधणाऱ्या  नेत्याचं नाव उघड केलं आहे. अमर काळे यांनी सांगितलं की, आम्ही अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी सोनिया दुहान यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विकासकामं करायची असतील तर एनडीएसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला त्यांनी दिला होता, असे अमर काळे यांनी सांगितले. तसेच माझ्याशीच नाही तर निलेश लंके, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनावणे यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला होता, असा दावा अमर काळे यांनी केला.

दरम्यान, शरद पवार गटातील अनेक आमदार आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मागच्या काही दिवसांमध्ये वारंवार केला आहे. तर सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधल्याचे वृत्त आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: Who contacted Ajit Pawar for joining the group? Sharad Pawar's MP Amar Kale directly revealed the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.