आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:55 IST2019-08-19T13:39:16+5:302019-08-19T13:55:31+5:30
सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही.

आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार
मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेताना, आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? आहेत. असा प्रश्न उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून दुसऱ्या टप्यातील ‘शिवस्वराज्य यात्रा' आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून, बालानगर येथे आज दुसऱ्या टप्यातील पहिली सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. माहिती अधिकाराचा कायदा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात करण्यात आला. मात्र आता या सरकराने या कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात आंदोलन करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता कुठे आहेत. असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही. माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र आता तोच कायदा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वापरला जाणार आहे. पण आता अण्णा यावर काहीच का बोलत नाही? असेही अजित पवार म्हणाले.