कधी येतो, वेळ सांग... नितेश राणेंना भाजपच्याच नेत्याचे आव्हान; घराबाहेरच लावले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:38 IST2024-09-04T15:37:48+5:302024-09-04T15:38:41+5:30
देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा असल्याने नितेश राणेंवर कारवाई केली जात नसल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत.

कधी येतो, वेळ सांग... नितेश राणेंना भाजपच्याच नेत्याचे आव्हान; घराबाहेरच लावले बॅनर
नितेश राणेंच्या भडकाऊ भाषणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवाज उठविलेला असताना आता भाजपाच्याच नेत्यांनीही कधी येतो, वेळ सांग अशा शब्दांचे बॅनर लावून आव्हान दिले आहे. महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीमध्ये राणे यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले आहे. यावरून आता भाजपातच राणेंना आव्हान दिले जाऊ लागले आहे.
देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा असल्याने नितेश राणेंवर कारवाई केली जात नसल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. खुद्द राणेच माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, पोलीस काही करू शकत नाहीत, असे सांगत फिरत आहेत. नितेश राणे मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. अशातच भाजपचे मुंबईतील मुस्लिम नेते हाजी अरफात शेख यांनी नितेश राणेंना कुर्ल्यात येण्याचे आव्हान दिले आहे.
तू वेळ आणि तारीख सांग, मी इथेच आहे, अशा आशयाचे बॅनर शेख यांच्या घराबाहेर लागले आहेत. नितेश राणेंनी कुर्ल्याच्या मशिदीमध्ये यावे असे आव्हानही त्यांनी दिले आहे. तसेच भाजप नेत्यांकडे नितेश राणेंची तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. राणे जर असेच बरळत राहिले तर भाजपमध्ये राहूनच त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशाराही शेख यांनी दिला आहे. यापुढे माझ्या धर्माबद्दल व धर्मगुरूबाबत बोलला तर याद राख, असेही शेख यांनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी अहमदनगर शहरात झालेल्या कार्यक्रमात मुस्लीम समाजाबद्दल धमकी देणारे विधान केले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात आणि श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.