बारामती : माळेगांव (ता.बारामती) येथे अजित पवार यांची प्रचार सभा सुरू होती.यावेळी भाजपाचा प्रचार करणारी वाहने त्या ठिकाणी पोहचल्यावर भाषणात अडथळा येऊन देखील पवार यांनी केलेल्या कोटीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. यावेळी पवार म्हणाले, अजित पवार काय म्हणत आहेत हे ऐकायला ते आले आहेत. आरं.. अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशील. माईकवर पण तू सांगशील आता ती (कमळाचं नाव न घेता) नको घड्याळ ..घड्याळ... घड्याळ... एवढा बावचाळून जाशील, अशा शब्दात पवार यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत केलेली कोटी सभेच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली.अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपलेल्या निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.बुधवारी (दि १७) बारामती तालुक्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासुनच विविध महत्वाच्या गावांमध्ये त्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. आज दुपारी माळेगांव येथे अजित पवार यांची सभा सुरू होती. गावात पवार यांची सभा रस्त्यालगतच सुरु असताना अचानक रस्त्यावरुन भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार करणारी वाहने त्याठिकाणी पोहचली. पवार यांचे भाषण सुरु असताना त्यावेळी आलेल्या वाहनांमधुन भाजपचा देखील प्रचार सुरु होता. या प्रचारामुळे पवार यांच्या भाषणात काही काळ अडथळा निर्माण झाला. पवार यांना त्यांचे भाषण देखील काही वेळ थांबवावे लागले. या दरम्यान वाहनातील स्पीकरमधून भाजपाचा जोरदार प्रचार सुरु होता.पण पवार यांनी या अडथळ्याला सहजपणे घेत कोटी केली.त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी पवार यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत केलेली कोटी सभेच्या ठीकाणी चर्चेचा विषय ठरली.
अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर ‘तू ’ सुध्दा ती (कमळी) नको म्हणत घड्याळाचं बटण दाबशील..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:20 IST
भाजपाचा प्रचार करणारी वाहने त्याठिकाणी पोहचल्यावर भाषणात अडथळा येऊन देखील पवार यांनी केलेल्या कोटीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.
अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर ‘तू ’ सुध्दा ती (कमळी) नको म्हणत घड्याळाचं बटण दाबशील..
ठळक मुद्देअजित पवार यांच्या कोटी ने उपस्थितांमध्ये हशा