"जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाजपेयींचा उल्लेख करत नितेश राणेंचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:30 IST2025-03-19T19:27:07+5:302025-03-19T19:30:45+5:30

LMOTY 2025: लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेढ वाढवणारी विधाने मंत्र्याकडून केली जातात, त्याबद्दल भूमिका मांडली.  

"When you are a minister, you have to speak with restraint"; Chief Minister Fadnavis Slams to Nitesh Rane | "जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाजपेयींचा उल्लेख करत नितेश राणेंचे टोचले कान

"जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाजपेयींचा उल्लेख करत नितेश राणेंचे टोचले कान

Lokmat Maharashtrian of The Year 2025: गेल्या काही दिवसांपासून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या विधानांची चर्चा होत आहे. त्याचा उल्लेख न करता विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सविस्तर उत्तर दिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका विधानाचा उल्लेख करत त्यांनी नितेश राणे यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०२५ पुरस्कार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. 

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा नामोल्लेख न करता जयंत पाटील यांनी मंत्र्याकडून धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. 

जयंत पाटलांनी काय विचारला प्रश्न?

"आपल्या सरकारमधील काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाच्या बाबतीत अत्यंत टोकाची भाषा वापरतात. त्यामुळे तेढ समाजात निर्माण होतेय, असे चित्र समाजात निर्माण व्हायला लागलं आहे. तर तुमची त्याबद्दल भूमिका काय?", असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा संयमानेच बोललं पाहिजे. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे आणि ज्याचा उल्लेख कधीतरी अटलबिहारी वाजपेयींनी केला होता की, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो."

आपले विचार बाजूला ठेवून...

याच प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले, "त्यामुळे आपले विचार काय आहेत? आपली आवड, नावड काय आहे, हे बाजूला ठेवून... आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. आणि संविधानाने आपल्याला कुणासोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे."

फडणवीस म्हणाले, तरुण मंत्र्याला सांगतो की... 

"मला असं वाटतं की, मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही. अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद करतो. त्यांना सांगतो की, आता तुम्ही मंत्री आहात, त्यामुळे संयम बाळगून बोललं पाहिजे", असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर दिले. 

Web Title: "When you are a minister, you have to speak with restraint"; Chief Minister Fadnavis Slams to Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.