फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 18, 2025 09:58 IST2025-05-18T09:53:50+5:302025-05-18T09:58:53+5:30

...मात्र त्यासाठी बसावे लागते... वेळ मिळाला की तुम्ही आमच्याकडे किंवा आम्हाला तुमच्याकडे बोलवा... पण बसणे महत्त्वाचे. आपल्याला पुस्तक लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! 

When will the books of Fadnavis, Shinde, Pawar be released | फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?

फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?

अतुल कुलकर्णी -

सर्व नेत्यांना नमस्कार. 
उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी त्यांचे परमप्रिय शरद पवार यांच्याकडून आदर्श घेत पुस्तक लिहिले आहे. आता बाकी नेत्यांनी वेळ घेऊ नये. त्यामुळे मराठी वाचकांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. तेव्हा इतरांनी लगेच ‘आपापल्या पक्षातील स्वर्ग’ अशी पुस्तके न लिहिता वेगळ्या वाटा निवडाव्या. कोणत्या विषयावरची पुस्तके, कोणी लिहावीत याची आम्ही कार्यशाळा आयोजित करण्याचा गंभीर विचार करत आहोत. त्यासाठी ‘बाबुरावांची लेखन कार्यशाळा’ येथे संपर्क साधू शकता..!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘सह्याद्रीचे वारे’ हे आत्मचरित्र लिहिले. शरद पवार यांच्या पुस्तकाचे नाव ‘लोक माझे सांगाती’ होते. तर त्यांच्या जवळच्याच सांगली जिल्ह्यातले संपतराव पवार यांनी शेतकऱ्यांनी स्वकष्टाने, स्वखर्चाने देशातले पहिले धरण कसे बांधले, त्याला ‘बळीराजा धरण’ नाव कसे दिले त्याची गोष्ट सांगणारे आत्मचरित्र ‘मी लोकांचा सांगाती’ या नावाने लिहिले. ‘लोक माझे सांगाती’ आणि ‘मी लोकांचा सांगाती’ यात कोणते नाव योग्य, हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे.

एकनाथ आव्हाड माजलगाव तालुक्यातले. त्यांनी ‘जग बदल, घालुनी घाव’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले. आव्हाड यांनी त्यांची संघर्ष गाथा यात मांडली होती. सोलापूर जिल्ह्यातल्या नरसय्या आडम मास्तर यांनी ‘संघर्षाची मशाल हाती’ हे आत्मचरित्र लिहिले. त्याशिवाय काकासाहेब गाडगीळ यांनी ‘पथिक’, शोभाताई फडणवीस यांनी ‘प्रत्यंचा’ आत्मचरित्र लिहिले. नाशिक येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर त्या काळी देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. त्यांनी ‘रात्रंदिना आम्हा’ हे आत्मचरित्र लिहिले.

यातल्या अनेकांनी इंग्रज सरकारविरुद्ध, आपल्या परिस्थितीविरुद्ध संघर्ष केला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सहन करावे लागलेले अनुभव शब्दबद्ध केले. आता काळ बदलला आहे. आता व्यक्तिगत दुःख, वेदना, हाल, झालेला छळ या गोष्टी पुस्तक रूपाने मांडण्याचे दिवस आहेत. ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ हे अनिल देशमुख यांचे पुस्तक आठवून बघा. संजय राऊत यांना ईडीच्या प्रकरणात अटक झाली. शंभर दिवस ते आर्थर रोड तुरुंगात होते. तेथे आलेले अनुभव त्यांनी पुस्तक रूपाने मांडताना कोणी, कोणावर, कसे, कधी व किती उपकार केले, याच्या कहाण्या लिहिल्या आहेत. राऊत यांचे पुस्तक आणि त्यावर चर्चा होणार नाही असे कसे..? पुस्तक किती विकले जाईल माहिती नाही, चर्चा मात्र खूप होईल हे नक्की.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण बालसाहित्य वाचत नाही, असे सांगितले. ते कोणत्या पुस्तकाबद्दल बोलले माहिती नाही. जर राऊत यांचे पुस्तक बालसाहित्यात मोडत असेल, तर त्यांनी प्रौढांसाठीचे लिहिल्यास त्यात काय काय लिहितील..? हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. काहीही असो. महाराष्ट्राचे राजकारण आता एकमेकांवर अभिजात भाषेत टीकाटिप्पणी करण्याच्या पलीकडे गेले आहे. आता आपले नेते एकमेकांवर पुस्तक लिहून वार करतील. (अत्यंत महत्त्वाचे : लिहिलेले पुस्तक फेकून वार करणे अपेक्षित नाही.) 

कोणी कोणत्या विषयावर पुस्तक लिहावे यासाठी ‘बाबुरावांची लेखन कार्यशाळा’ने काही विषय काढले आहेत. शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक आहे तर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘सत्ता माझी सांगाती’ असे पुस्तक लिहिता येईल. शरद पवार यांनी देखील गेल्या १० वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींवर ‘नेहरू सेंटर ते उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद’ असे दुसरे पुस्तक लिहायला हरकत नाही. उद्धव ठाकरे यांनी ‘युतीत सडलेली २५ वर्ष आणि खोके बोके’ यावर पुस्तक लिहावे. राज ठाकरे यांनी ‘एकही आमदार, खासदार नसताना शिवतीर्थाची ताकद’ हा विषय पुस्तकासाठी घ्यावा. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘गोवाहाटी फाईल्स’ हा प्रवास लिहिला तर त्यावर हॉलिवुडमधील अनेक दिग्दर्शक सिनेमा काढायला तयार होतील. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधी जे आमदार गोव्याला गेले होते, त्यांनी ‘गोव्यातली मंतरलेली रात्र’, ‘गोव्यातला टेबलवरचा डान्स’, अशा छोट्या कथा लिहायला हरकत नाही. प्रत्येकाने कादंबरीच लिहिली पाहिजे, असे नाही. संजय शिरसाट यांनी ‘७२ व्या मजल्यावरून मुंबईचे शूटिंग कसे करावे?’ यावर इन्स्टासाठी रीळा बनवणाऱ्यांना मार्गदर्शन कथा लिहावी. देवेंद्र फडणवीस यांना ‘पहाटेचे शपथविधी अयशस्वी का ठरतात?’ यावर चिंतनात्मक पुस्तक लिहिता येईल. भविष्यात मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्यांना आणि राज्यपालपदी विराजमान होणाऱ्यांना त्यातून मार्गदर्शन मिळेल. रामदास आठवले यांनी ‘माझ्या शीघ्र कवितांचे गमक’ हा विषय घ्यायला हरकत नाही. नीलमताई गोऱ्हे यांनी ‘मर्सिडीजचे रहस्य’ लिहिले तर त्यावर मालिका होईल. यामुळे मराठी साहित्यात नवचैतन्य निर्माण होईल. अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा सार्थकी लागेल. यापुढचे सगळे ज्ञानपीठ आणि साहित्य पुरस्कार महाराष्ट्रालाच मिळतील... केवढी मोठी क्रांती होईल... नुसत्या कल्पनेनेच आमच्या अंगात प्रचंड काहीतरी होत आहे.

तसे आम्ही सगळ्यांनाच विषय पुरवू शकतो. मात्र त्यासाठी बसावे लागते... वेळ मिळाला की तुम्ही आमच्याकडे किंवा आम्हाला तुमच्याकडे बोलवा... पण बसणे महत्त्वाचे. आपल्याला पुस्तक लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! 
- तुमचाच बाबूराव

Web Title: When will the books of Fadnavis, Shinde, Pawar be released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.