"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:16 IST2025-06-26T11:15:34+5:302025-06-26T11:16:06+5:30
Bhaskar Jadhav News: काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. दरम्यान, आता भास्कर जाधव यांनी सोशल मीडिया माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेटस चर्चेत आहेत.

"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. दरम्यान, आता भास्कर जाधव यांनी सोशल मीडिया माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेटस चर्चेत आहेत. दिव्यामध्ये तूप तेव्हाच टाकलं पाहिजे तेव्हा तो पेटत असतो, दिवा विझल्यानंतर त्यात तूप घालून काही उपयोग होत नाही अशा आशयाचं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे. आता राजकीय वर्तुळातून भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा संदर्भ त्यांच्या ठाकरे गटातील सद्यस्थितीशी जोडला जात आहे.
गुहागरचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या नाराजीला मोकळी वाट करून देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेली दोन स्टेटस चर्चेत आहेत. त्यातील एका स्टेटसमध्ये भास्कर जाधव म्हणतात की, दिवा जेव्हा तेवत असतो तेव्हाच त्याच्यात तूप टाकलं पाहिजे, दिवा विझल्यानंतर त्यात तूप टाकून उपयोग नसतो, त्याचप्रमाणे माणसाची कदर ही हातात वेळ असताना केली पाहिजे, वेळ निघून गेल्यावर हळहळ व्यक्त करून उपयोग नसतो.
तर दुसऱ्या एका स्टेटसमध्ये भास्कर जाधव यांनी लिहिले की, सर्वजण सोबत आहेत. तरीही एक प्रकारचा रितेपणा जाणवतोय, आजकाल नात्यांमध्येही दाखवण्यापुरता आपलेपणा उरला आहे. दरम्यान, नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशा चर्चा आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे विचार बोलून दाखवले होते. कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे भास्कर जाधव म्हणाले होते.