Kojagari Pournima 2025: कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:57 IST2025-10-05T06:56:52+5:302025-10-05T06:57:14+5:30
Kojagari Pournima 2025: या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि ‘को जागर्ती?’-म्हणजे ‘कोण जागा आहे?’ असा प्रश्न करते. जो जागा असतो त्याला ती वैभव, समृद्धी आणि सौख्य प्रदान करते, अशी श्रद्धा आहे.

Kojagari Pournima 2025: कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदा ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा आहे. याच दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करावी, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते
दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या रात्री लक्ष्मी आणि इंद्राची पूजा, तसेच उपवास, पूजन आणि जागरण या तिन्ही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. घरे, मंदिरं आणि परिसरात दिव्यांची रोषणाईची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली.
सोमण म्हणाले, या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि ‘को जागर्ती?’-म्हणजे ‘कोण जागा आहे?’ असा प्रश्न करते. जो जागा असतो त्याला ती वैभव, समृद्धी आणि सौख्य प्रदान करते, अशी श्रद्धा आहे.” ते पुढे म्हणाले, ‘इथे ‘जागरण’ म्हणजे केवळ निद्रेतून जागे राहणे
नव्हे, तर आळस, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिती आणि अविचार यांच्या निद्रेतून जागे होणे हे खरे जागरण आहे. अशा माणसालाच खऱ्या अर्थाने लक्ष्मीप्राप्ती होते.’
निसर्गाचा आनंद लुटावा
कोजागरी पौर्णिमा हा निसर्गाशी एकरूप होण्याचा उत्सव आहे. पावसाळ्यानंतर येणारी ही पहिली पौर्णिमा असल्याने, त्या रात्री आकाश निरभ्र आणि चंद्र तेजस्वी असतो.
“या चांदण्याच्या रात्री कुटुंबीय आणि मित्रांसमवेत एकत्र येऊन निसर्गाचा आनंद लुटावा, या भावनेतून या उत्सवाची परंपरा रुजली आहे, असेही त्यांनी सांगितले.