शिवसेनेचं सरकार आलं अन् तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:14 IST2019-12-02T17:06:53+5:302019-12-02T17:14:39+5:30
हर्षवर्धन हा लहानापासून शिवसैनिक असून त्याची आई विजया त्रिभुवन देखील शिवसेनेच्या महिला शाखेची पदाधिकारी आहे.

शिवसेनेचं सरकार आलं अन् तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी !
मुंबई : राज्यात जोपर्यंत शिवसेनेची सत्ता येणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी आगळीवेगळी शपथ घेतलेल्या एका शिवसैनिकाने तब्बल तीन वर्षानंतर दाढी केली आणि आपली शपथ पूर्ण केली. औरंगाबादच्या हर्षवर्धन त्रिभुवन या युवकाने ही आगळीवेगळी शपथ घेतली होती. शनिवारी विधानसभेत महाआघाडीने बहुमत सिद्ध केले आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारले. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर हर्षवर्धनने दाढी केली.
हर्षवर्धन हा लहानापासून शिवसैनिक असून त्याची आई विजया त्रिभुवन देखील शिवसेनेच्या महिला शाखेची पदाधिकारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हर्षवर्धन प्रभावित आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होई पर्यंत दाढी करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती.
विशेष म्हणजे हर्षवर्धन याने ठेवलेल्या दाढी मुळे घरातील मंडळी देखील रागावत होते. परंतु हर्षवर्धनने निश्चय मोडला नाही. युवा सेनेचे प्रमुख व शिवसेना आमदार आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शहराच्या दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हर्षवर्धनला या वेळी आपल्याला दाढी करायची आहे. असेही सांगितले होते.
अखेर राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा हर्षवर्धनचे स्वप्न पूर्ण झाले. रविवारी सकाळी रेल्वेस्टेशन जवळील साई अमृत प्लाझा येथे शिवसैनिक एकत्र आले आणि घोषणा देत त्याची दाढी काढली. मात्र हर्षवर्धनच्या आगळीवेगळी शपथीची चर्चा जिल्ह्याभरात पाहायला मिळत आहे.