...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 20:31 IST2020-01-03T20:23:04+5:302020-01-03T20:31:33+5:30
निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे.

...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन..
इंदापूर ( शेटफळगढे ) : काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे.मात्र, कर्जमाफी मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. मात्र, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोबाईलवर संपर्क साधुन कर्जमाफी योजनेच्या दिलेल्या माहितीची सर्वत्र चर्चा रंगली. अर्थात मुख्यमंत्र्यांनी साधलेला हा संवाद त्यांचा व्हॉईस मेसेज होता.
निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कर्जाचा बोजा असणारे शेतकरी,नियमित कर्जफेड करणारे शेतकरी नाराज आहेत. निवडणुकीच्या काळातच बड्या नेत्यांचे अशा प्रकारे व्हॉईस मेसेज द्वारे कॉल येतात. मात्र, निवडणुक नसताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधलेला संवाद शेतकऱ्यांच्या चचेर्चा विषय ठरला. ग्रामीणभागात अनेकांनी त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आल्याचे एकमेंकांना सांगितले.व्हॉईस मेसेजचा प्रकार माहित नसणारे शेतकरी ठाकरे यांच्या व्हॉईस मेसेज कॉलने हरखुन गेल्याचे चित्र होते.
शुक्रवारी(दि ३) सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना द्वारे संपर्क साधला. यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कसे आहात, अशी चौकशी करुन योजनेची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज शासन भरणार आहे. तसेच चिंतामुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांनी चिंतामुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळे काहीकरण्याची गरज नाही. केवळ कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन व्हॉईस कॉलमध्ये ठाकरे यांनी केले . मुख्यमंत्री स्वत: व्हॉइस कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे व्हाईस कॉल शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. प्रथमच शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती थेट मुख्यमंत्री या कॉल द्वारे सांगत असल्याचा शेतकऱ्यांचा पहिलाच अनुभव आहे.
———————————