अमित शहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनंतर लागलीच फडणवीसही दिल्लीत पोहोचलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:00 IST2024-07-25T06:56:30+5:302024-07-25T07:00:07+5:30
शिंदे सरकारला जेमतेम दोन महिने राहिले आहेत. या दोन महिन्यांसाठी का होईना मंत्रिपदाचे बाशिंग बांधायला मिळावे म्हणून तिन्ही पक्षातील इच्छुक आस लावून बसले आहेत.

अमित शहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनंतर लागलीच फडणवीसही दिल्लीत पोहोचलेले
राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. लोकसभेत दारुण पराभव झाल्याने अजित पवार गटाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. तर भाजपात देखील अजित पवार नकोत असा सूर उमटू लागला आहे. आरएसएस उघडपणे अजित पवार सोबत नकोत अशी भूमिका घेत आहे. यातच अजित पवारांनी गेल्या चार दिवसांत दोनवेळा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नेमके महायुतीत चाललेय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शिंदे सरकारला जेमतेम दोन महिने राहिले आहेत. या दोन महिन्यांसाठी का होईना मंत्रिपदाचे बाशिंग बांधायला मिळावे म्हणून तिन्ही पक्षातील इच्छुक आस लावून बसले आहेत. अशातच भाजपाला १५० ते १६० जागा लढवायच्या असल्याचे समोर आल्याने शिंदे आणि पवार गटात खळबळ उडाली आहे. काहीही करून राष्ट्रवादीला ८०-९० जागा लढवायच्या आहेत. भाजपला १०० पार होण्यासाठी १५० प्लस जागा लढवायच्या आहेत. त्यात शिंदे गटालाही ८०-९० जागा हव्या आहेत. यावरून अजित पवार गट नाराज असून एकला चलो रे चा सूर राष्ट्रवादीत आहे.
राष्ट्रवादी स्वबळावर एकटी लढली तर शरद पवार यांची महाविकास आघाडी आणि महायुतीच्या तुंबळ लढाईत अजित पवारांचे मोठे नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी रातोरात दिल्ली गाठली होती. मंगळवारी रात्री १ वाजल्यापासून बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अजित पवार अमित शहा यांच्या निवासस्थानी चर्चा करत होते. सुमारे सात तास चाललेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला गेले होते. यामध्ये महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाली, असे सुत्रांनी सांगितले.
या बैठकीत लवकरात लवकर जागा वाटप करावे अशी विनंती अजित पवारांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादीला ८०-९० जागा लढायच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीसारखे शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटप न टाळण्याबाबतही शहांकडे मागणी करण्यात आली आहे.