मुंबईत गेल्या दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे लोकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय, येत्या काही तासांत मुंबईत आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मुंबई आणि उपनगरीय भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून महत्त्वाची माहिती दिली.
मुंबईत मुसळधार पाऊसमुंबई शहर व उपनगरे क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट' वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली.
महानगरपालिकेची यंत्रणा सतर्कपावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क असल्याचेही मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहननागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.