संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:18 IST2025-10-03T06:18:16+5:302025-10-03T06:18:32+5:30
शिंदेसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी गोरेगाव येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई : कपड्याची इस्त्री सांभाळणारा, व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा, वर्क फार्म होम, फेसबुक लाइव्ह करणारा हा एकनाथ शिंदे नाही, आपत्तीत घरात बसणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही. यांचे दौरे म्हणजे ‘खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम’. कुठेही गेले की माझे हात रिकामे आहेत म्हणतात, जेव्हा होते तेव्हा दिले नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पूरग्रस्त दौऱ्यांवर जोरदार टीका केली.
शिंदेसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी गोरेगाव येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदेसेनेने पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या पाकिटांवर फोटो लावल्याबद्दल केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, यांना फोटो दिसतात, पण २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आम्ही दिल्या, तुम्ही एक बिस्कीटचा पुडा तरी घेऊन गेलात का?
पक्षाचा प्रमुख पक्षातील कार्यकर्ते संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो का? याला संपव,त्याला संपव, हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. म्हणून त्यांची ही परिस्थिती झाली.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
दिवाळीपूर्वी मदत देण्याचा शेतकऱ्यांना दिला शब्द
बळीराजाचे दुःख मोठे आहे. मी बांधावर जाऊन त्यांचे दुःख पाहिले. जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. माझी लाडक्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही धीर सोडू नका, तुमचे भाऊ इकडे आहेत. दिवाळीपूर्वी मदत देऊ अशा शब्दांत त्यांनी बळीराजाला आश्वस्त केले. मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्न ठरली असतील, त्याची सर्व जबाबदारी शिंदेसेना घेईल. २०२६ हे वर्ष बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असून ते जोरदार साजरे केले जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले.
शंभर वर्षे झालेल्या संघावर टीका करणारे कसले हिंदुत्ववादी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष झाली, त्यांनी समर्पित भावनेने देशाची सेवा केली, पण संघावर टीका करणारे कसले हिंदुत्ववादी? असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला.