अभूतपूर्व जनाधाराची जबाबदारी काय आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 08:47 IST2025-01-12T08:44:41+5:302025-01-12T08:47:37+5:30

शिर्डी येथे आज, 12 जानेवारीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या या भावना.

What is the responsibility of unprecedented public support? Chandrashekhar Bawankule expressed his feelings | अभूतपूर्व जनाधाराची जबाबदारी काय आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या भावना

अभूतपूर्व जनाधाराची जबाबदारी काय आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या भावना

- चंद्रशेखर बावनकुळे 
भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री, महाराष्ट्र 

महाराष्ट्राच्या राजकारणास सभ्यतेची आणि आदराची परंपरा होती. राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे मतभेद कितीही टोकाचे असले तरी इतकी खालची पातळी कधीही गाठलेली नव्हती. राजकीय सभ्यतेची  नीती ही महाराष्ट्राच्या राजकारणाने संस्कृतीचा वारसा म्हणून जपली.
२०१९ मध्ये युतीला मिळालेला सत्तास्थापनेचा जनादेश नाकारून त्यांनी जनदेशाचा अपमान केला. युतीधर्म संपविला. महाविकास आघाडीच्या तंबूत प्रवेश करून मुख्यमंत्रिपद मिळविले, तेव्हापासून या संघर्षाने बीभत्स टोक गाठण्यास सुरुवात केली, हे गेल्या पाच वर्षांवर नजर टाकल्यास सहज स्पष्ट होऊ शकते. असभ्य उपमा देत मिळविलेल्या टाळ्या आणि अस्तित्वाचं आव्हान देऊन केलेला अतिरेकी भावनांचा खेळ या सगळ्या बाबी महाराष्ट्राच्या त्या संस्कृतीस लाजेने तोंड लपविण्यास भाग पाडणाऱ्या ठरल्या. एका बाजूला अशा असभ्य टीकेला आणि खोटेपणा पसरविण्याच्या एककल्ली कार्यक्रमातून सुरू झालेल्या प्रतिमाभंजनाच्या मोहिमेला संयमाने आणि संयतपणे सामोरे जात लोकनेते देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणाची सभ्यतेची परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असताना, ज्या काही अन्य नेत्यांनी या परंपरेचा वारसा राज्यासमोर सातत्याने मांडला, जपण्याची आणि जोपासण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली.

सत्ताधाऱ्यांमध्ये सामंजस्य असणे आवश्यक असते. कारण तशी भूमिका जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी गरजेची असते. ते दूरच राहिले. उलट, जनतेलाच समोर बसवून त्यांच्या साक्षीने आपले व्यक्तिगत हेवेदाव्यांचे हिशेब चुकते करण्याकरिता सभ्यतेची पातळी सोडून जिभा सैल सोडण्याचे घातक खेळ राज्याच्या स्वास्थ्याला रसातळाला नेऊन ठेवू शकतात, याची जाणीव या नेत्यांना झालीच नव्हती. २०२४ च्या विधानसभा  निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने या नेत्यांना ती जाणीव पूर्णपणे करून दिली आहेच, पण त्याबरोबरच राज्याच्या राजकारणातील त्या हरवत चाललेल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारीही भारतीय जनता पक्षाच्या शिरावर दिली आहे. अभूतपूर्व जनाधार, विधिमंडळातील विक्रमी संख्याबळ आणि जनतेची, शेतकरी बांधवांची, लाडक्या बहिणींची विलक्षण साथ हे सारेच अतुलनीय आहे. म्हणूनच, भाजपला जबाबदारीची जाणीवही तीव्र आहे.

बिघडलेली वातावरणाची घडी पुन्हा व्यवस्थित करण्याकरिता आपण पक्ष पातळीवर सातत्याने प्रयत्न केले आणि करत राहू. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचत राहिला आणि राज्याच्या भविष्याला आकार देण्याकरिता भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेल्या कटिबद्धतेची ग्वाही देत राहिला. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेच्या शिस्तीचे पुरेपूर पालन करून आव्हान पार पाडले. आता त्या विश्वासाचे सोने करण्याची जबाबदारी घेऊन प्रामाणिकपणे सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे व्रत आपण सुरू केले आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही, अशी हमी आपले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी राज्याला दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे महाराष्ट्रावर असलेले लक्ष आणि सततचे पक्षीय, सामाजिक व राजकीय मार्गदर्शन असल्याने भाजप जनतेची प्रथम पसंती ठरू शकला, हे निर्विवाद सत्य आहे. 

लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांकरिता विविध योजना, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेल्या योजना, युवक कल्याणाच्या नव्या योजना या केवळ सरकारी घोषणा नव्हेत, तर त्यांच्या लाभामुळे समाजाच्या सशक्तीकरणाचा नवा प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे. दहा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात स्थैर्य आणण्याचे, जनतेच्या सुरक्षित जगण्याचे आणि विकासाच्या योजना राबविण्याचे वेगवेगळे प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या सहकार्याने आणि भक्कम पाठबळामुळे सुरू होते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची फळे दिसू लागली आहेत. विरोधकांनाही कौतुक केले. भारतीय जनता पक्षाच्या समाजहिताशी असलेल्या कटिबद्धतेचा याहून वेगळा पुरावा गरजेचाच नाही. केवळ एखाद्या सरकारने काय केले, यावर त्याच्या यशाचे मोजमाप केले जात नसते. सरकारने जे काही केले, त्याचे लाभ तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले किंवा नाही यावर त्या सरकारचे यश ठरविले जाते. त्या दृष्टीने महायुती सरकारचा कार्यकाळ हा महाराष्ट्राला प्राप्त झालेल्या संधींचा आणि संधींचे सोने करण्याचा सुवर्णकाळ म्हणून नोंदविला जाईल. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही आपल्या नेतृत्वाने दिलेली आहे.  

संघटना, लोकप्रतिनिधी आणि सरकार यामध्ये समन्वय साधून राज्यातील प्रत्येक समाजघटकाचे कल्याण साधणे हेच आपले कर्तव्य आहे, कारण तोच आपला संस्कारदेखील आहे. शिक्षण, औद्योगीकरण, प्रकल्पग्रस्तांचे न्याय्य पुनर्वसन, समतोल विकास आणि अनुशेष वा शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक प्रश्नांवर सकारात्मकदृष्ट्या भरीव काम करण्याची संधी संपूर्ण बहुमत असलेल्या स्थिर सरकारला लाभली आहे. महाराष्ट्र हीच कर्तृत्व सिद्ध करण्याची भूमी आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आणि लक्ष्य आहे. जुन्या वाटांना पडलेली भगदाडे बुजवून महाराष्ट्र आता नव्या विश्वासाने पुढे जात आहे याची ग्वाही देण्याचा आत्मविश्वास आणि शक्तीदेखील आपल्याकडे आहे. या शक्तीचे आणि संधीचे सोने करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया! बिघडलेले राजकारण सुधारण्याचा आश्वासक प्रारंभ आपण केलेला आहेच, ही वाटचाल पुढेही सुरू राहील.

Web Title: What is the responsibility of unprecedented public support? Chandrashekhar Bawankule expressed his feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.