"गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच..."; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:27 IST2025-01-25T13:24:05+5:302025-01-25T13:27:16+5:30
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

"गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच..."; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल
Jayant Patil OnDavos World Economic Forum: गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्र्यांचा दावोस दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. दावोस येथे झालेल्या बैठकांमधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार झाल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र विरोधकांकडून राज्यातील भरघोस गुंतवणुकीच्या करारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या गुंतवणूक दौऱ्यावरुन सवाल विचारला आहे. गेल्या वर्षी झालेल्या करारांचे काय झालं असं म्हणत सरकारने फक्त मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दावोस दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राने वर्ल्ड इकोनॉमी फोरमध्ये ६१ करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यात १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली असून १६ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जे नेतृत्व मिळवून दिले त्याचे प्रत्यंत्तर आम्हाला पाहायला मिळाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र आता जयंत पाटील यांनी मागच्या वर्षी झालेल्या करारांचे पुढे काय झालं असा सवाल उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांनी एक्स पोस्ट करुन सरकारवर निशाणा साधला आहे.
"मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवसापर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकूण ५४ समंजस करार. दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. पण ही फक्त पीआर अॅक्टिव्हिटी नसावी म्हणजे झाले! कारण मागील वर्षीही अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या. उदा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार. जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींचा करार, हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचा करार. या करारांचं पुढे काय झाले, प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे राज्यकर्त्यांनांच ठाऊक. यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा व महाराष्ट्राची भरभराट व्हावी ह्याच शुभेच्छा," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इन्फ्रास्क्ट्रक्चर, ग्रीन एनर्जी, सोलार, फायनान्स, लॉजेस्टिक, इंटरटेनमेंट, आयटी, स्टील, डेटा सेंटर, शिक्षण, संरक्षण, ऑटो, इलेक्ट्रिक, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसह अनेक क्षेत्रातील करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली होती. एमएमआर विभागात जवळपास ६ लाख कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विदर्भात ५ लाख कोटी, उत्तर महाराष्ट्रात ३०-३५ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.