‘प्रेरणा’ म्हणजे नेमके काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:59 AM2019-08-16T00:59:37+5:302019-08-16T01:00:09+5:30

प्रेरणा म्हणजे काय?... प्रेरणा येते कुठून?... प्रेरणा कशी मिळते? म्हणजे... प्रेरणा म्हणजे नेमके काय असते? जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो. यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते.

What exactly is 'inspiration'? | ‘प्रेरणा’ म्हणजे नेमके काय?

‘प्रेरणा’ म्हणजे नेमके काय?

googlenewsNext

- संतोष सोनावणे 
 प्रेरणा म्हणजे काय?... प्रेरणा येते कुठून?... प्रेरणा कशी मिळते? म्हणजे... प्रेरणा म्हणजे नेमके काय असते?
जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो. यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मत: मुलांसाठी आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते. किंबहुना, प्रत्येक व्यक्ती आपल्या आईला प्रथम प्रेरणास्थान मानते. कुटुंबातील आणि परिसरातील इतर व्यक्तीदेखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात. अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. तर, मोठेपणी काही व्यक्ती आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरते.

खरं आहे की, दुसऱ्याचे विधायक कार्य हे आपणास निश्चितच प्रेरणा देणारं होऊ शकतं आणि ते अनेक उदाहरणांनी पटवूनही देता येईल. परंतु, मग सगळीकडेच अशी सकारात्मक परिस्थिती का निर्माण होत नाही, याचाही विचार व्हायला पाहिजे. उणीव कशाची आहे, तर प्रेरणेची नव्हे अंत:प्रेरणेची. अंत:प्रेरणा म्हणा किंवा ‘सिक्स्थ सेन्स’ म्हणा, हा एक तर नैसर्गिक असतो किंवा तो प्राप्त करावा लागतो. या अंत:प्रेरणेमुळे वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करणं सोपं जातं. एखादा अवघड निर्णय घेणंही यामुळे शक्य होतं. नातेसंबंधांमध्ये योग्य ती भूमिका घेण्यास मदत होते आणि अर्थातच करिअरचा मोठा पल्ला गाठायलाही याचा उपयोग होतो. व्यक्तीची वैचारिक बैठक व आपल्या कर्तव्याविषयी असलेली नितांत श्रद्धा यातूनच अंत:प्रेरणा जागृत होत असते. आपल्या कामाची जबाबदारी व आपली व्यक्तिगत वर्तणूक यांचा साकल्याने विचार करणारी व्यक्ती ही आपल्या कार्यक्षेत्रात व सार्वजनिक जीवनात नेहमी यशस्वी होताना तसेच अधिक कार्यक्षम होताना दिसत असते.

आपली अंत:प्रेरणा अर्थात आपल्या कार्यक्षेत्रातील कार्य करण्यासाठी आपणास प्रवृत्त करणारी किंवा उद्युक्त करणारी एक प्रकारची ऊर्जाच होय. त्या अनुषंगाने आपले विचार, त्यानुसार आपली कृती यांच्यामागील असलेला कार्यकारणभाव आणि त्याला नियंत्रित करणारी शक्ती म्हणजेच अंत:प्रेरणा होय.

अंत:प्रेरणेतून आपली धडाडी, ऊर्मी, इच्छाशक्ती व आपला दृष्टिकोन स्पष्ट होत असतो. आपली आपल्याकडून असलेली मूलभूत इच्छाच आपली अंत:प्रेरणा जागृत करत असते. मला काय हवं आहे? मला काय करायचं आहे? अशा प्रकारच्या प्रश्नांतूनच खरी सुरुवात होत असते. यात कोणतेही दडपण किंवा लादणे नसते. ते आपल्या हृदयातूनच यायला हवं. यात खूप खोलवर अशी तृष्णा दडलेली असते. हे मी करायला हवे, असे सतत जाणवत असते. यात एक भावनिक जुळवणूक निर्माण झालेली असते. अशा इच्छा पूर्ण झाल्यावर होणारा आनंद फार मोठा असतो. ज्याची किंमत व मोजदाद होऊच शकत नाही.

मात्र, अशी अंत:प्रेरणा जागृत असणाºया व्यक्तींचेही तीन वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण केलेले असते. तेही समजून घेणं गरजेचं आहे.
थोडक्यात काय तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या विचारावर व आपल्या कृतीवर आपण आपले कार्यक्षेत्र उजळून टाकू शकतो. दुसरीकडून प्रेरणा घ्यावी, परंतु बाहेरून मिळणारी प्रेरणा ही खूपच अल्पजीवी असते. त्यामुळेच तिच्यात ताकद नसते. परंतु, जेव्हा आपल्याला आतून, आपल्या हृदयात एखादी गोष्ट बसते, एखादी गोष्ट पटते, तेव्हा त्यापासून ऊर्जा मिळते आणि तेव्हा मात्र आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. यश, यश म्हणजे तरी नेमकं काय हो? तर आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे आपल्याला घडवता आलं की, ते मिळालंच समजा.

१) मान्यताप्रेरणा
या विश्वातील सर्वाधिक अर्थात ९० टक्क्यांहून अधिक लोकांची अंत:प्रेरणा ही मान्यताप्रेरणा असते. अशा प्रकारातील व्यक्ती या चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. घेतलेलं काम किंवा दिलेलं काम पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. त्याला कोणी चांगले म्हटले तर त्यांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते आणि कोणी नाही म्हटले तरी ते त्याचा जास्त विचार करीत नाहीत. आपल्या नशिबात आहे, तेवढेच आपणास मिळेल, त्यामुळे अधिकचे नको. अशा प्रकारच्या व्यक्ती या बºयाचवेळा इच्छा आहे म्हणून काम करत नाहीत, तर नाइलाजाने करावं लागतंय म्हणून करतात. त्या गोष्टी करण्यामागे एकतर कर्तव्याची भावना किंवा शिक्षेची भीती असते. समाजाच्या किंवा व्यवस्थेचे नीतिनियम, परंपरा यांना ते सोडत नाहीत. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे धाडस ही मंडळी करत नाहीत. ठरावीक व्यवस्थेच्या मान्यतेचा बडगा त्यांच्यावर असतो.

२) सत्ताप्रेरणा
या विश्वातील सहा ते सात टक्के लोकांची अंत:प्रेरणा ही सत्ताप्रेरणा असते. ही मंडळी बरीच आत्मकेंद्री असते. इतरांवर आपला प्रभाव असावा. आपले दिसणे, बोलणे, चालणे याकडे इतरांचे लक्ष असावे, अशी त्यांची वर्तणूक असते. आपला मोठेपणा मिरवण्यात या लोकांना धन्यता वाटत असते. सतत त्यांना सत्तेचा आग्रह असतो. यात केवळ राजकीय सत्ता नाही, तर समाजात वावरताना आपण पुढे असावे, आपली छाप असावी, यासाठी त्यांची धडपड असते. ही मंडळी खूप धूर्त व आतल्या गाठीची असते. आपल्या कार्यक्षेत्रात त्यांना इतर व्यक्ती स्पर्धक नको असतात. या धडपडीत त्यांच्या हातून चांगली कामेही होत असतात. या सगळ्यात स्वत:ची बदनामी होऊ नये, याकरिता ते काळजीही घेत असतात. मात्र, फाजील आत्मविश्वासाचे ते बळी ठरतात.

३) सिद्धिप्रेरणा
या विश्वातील ३ ते ४ टक्के लोकांकडेच सिद्धिप्रेरणा असते. सिद्धिप्रेरणा अर्थात आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. मला हे माहीत नाही, मात्र मी हे करणार असा विश्वास त्यांच्या ठायी असतो. आपल्या जगण्याची व जीवनात यशस्वी होण्याची नियोजनबद्ध तयारी यांच्याकडे असते. त्याकरिता त्यांची सतत धडपड सुरु असते. ते संधीची कधीही वाट बघत नसतात तर ते स्वत: आपल्या विचारातून, कृतीतून संधी निर्माण करीत असतात. स्वत: शिकण्याकडे, जाणून घेण्याकडे त्यांचा कल असतो. कष्ट करण्याची धमक, जिद्द व मनाची तयारी त्यांच्या ठायीठायी दिसून येते. अधिकाधिक मित्र जोडून ते त्यांच्या सहकार्याने यशाचे शिखर गाठत असतात. सतत विनम्रतेची भावना जपून ते समाजातील प्रत्येकाचे मन जिंकत असतात. मिळालेल्या यशातही ते अगदी सहजता दाखवत असतात हे विशेष. एका यशानंतर पुढच्या टप्प्याचा विचार त्यांच्या मनात लगेच सुरु होत असतो. आपल्या कार्याबद्दल व यशाबद्दल त्यांना खात्री असते, तसेच ते स्वत:च्या विचारावर ठाम असतात.

Web Title: What exactly is 'inspiration'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.