कल्याण : महाविकास आघाडीसाठी तसेच स्वत: मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसची हुजरेगिरी केली. सोनिया गांधी यांना भेटायला वारंवार दिल्लीला जात होतात. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवलात, त्याचे काय ते आधी बोला, असा टोला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रविवारी उद्धव ठाकरेंना लगावला.
टिटवाळा येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाला मंत्री कदम उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीबाबत संजय राऊत आणि ठाकरे यांच्याकडून होत असलेल्या टीकेबाबत माध्यमांनी विचारणा केली असता कदम यांनी सांगितले की, दुसऱ्याकडे बोट दाखवताना तीन बोटं आपल्याकडे असतात, याचे भान ठाकरेंनी ठेवले पाहिजे.
स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरूआमच्या पक्षात आणि भाजपमध्ये सख्य नाही, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण अधिवेशनात कोण कोणासोबत होते, हे त्यांनाही कळून चुकले आहे. आज गृह राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तसेच महसूल आणि खात्यांचे काम करायला मिळते आहे. त्याद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत, असे कदम म्हणाले.
‘त्या’ श्रेयात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटामहायुतीला विधानसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सगळे मंत्री चांगले काम करत आहेत. आमच्यामध्ये आणि भाजपमध्ये चांगले वातावरण आहे, असे कदम म्हणाले.