’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:40 IST2025-12-27T20:39:18+5:302025-12-27T20:40:02+5:30
Mangesh Kalokhe Murder Case: रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले आहे.

’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
रायगड - रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, रायगड जिल्ह्यात यापूर्वी कधीही राजकीय वैमनस्य एवढ्या टोकाला गेले नव्हते. मात्र मंगेश यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण घडले. अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. माझे या संपूर्ण केसवर पूर्ण लक्ष आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर मोक्का सारखे गुन्हे दाखल करू, या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करून आरोपींना फासावर वाढवण्यासाठी प्रयत्न करू. असे सांगितले. तसेच या प्रकरणी काळोखे कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू असेही स्पष्ट केले.
यानंतर खोपोली पोलिस स्टेशनला घेराव घालून बसलेल्या शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करून कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगितले. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. या घटनेत काळोखे कुटुंबाच्या पाठीशी शिंदेसेना ठामपणे उभी असून, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही असेही सांगितले.