"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 09:06 IST2025-05-07T09:05:21+5:302025-05-07T09:06:19+5:30

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

We have succeeded in sending the message that action will be taken in this manner until Pakistan sponsored terrorism is completely eradicated dcm ajit pawar on operation sindoor | "पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"

"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"

भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केले. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं अभिनंदन केलं. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, असंही ते म्हणाले.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’नं पुन्हा सिद्ध केलं आहे. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानं संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं, असं अजित पवार म्हणाले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असंही ते म्हणाले. 

देशाच्या सीमेपलिकडे जावून लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहसी, कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे. भारतीय सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य, मोकळीक, ताकद देत त्यांच्यामागे भक्कमपणे उभं राहिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचंही अजित पवार यांनी अभिनंदन केलं. सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचे सांगत दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: We have succeeded in sending the message that action will be taken in this manner until Pakistan sponsored terrorism is completely eradicated dcm ajit pawar on operation sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.