"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 22:11 IST2025-10-02T22:10:32+5:302025-10-02T22:11:07+5:30
"जे संघाचे लोक आहेत, जेव्हा संकट, आपत्ती येते, तेव्हा मदतीसाठी धाऊन जातात. संकटात धाऊन जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाले आहेत. एका समर्पित भावाने त्यांनी या देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त, देशभक्त आरएसएसवरही टीका करण्याचं काम तुम्ही करत आहात. तुम्ही कसले हिंदूत्ववादी?"

"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
आम्ही दिल्लीला जातो... दिल्लीला जातो..., तुमच्या सारखे 10 जनपथला मुजरे करायला जात नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणाला जातो. आणि 10 लाख कोटी जे आले आहेत, ते महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले आहेत. असे म्हणत, शिवसेना मुख्य नेते (शिंदे गट) तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. ते मुंबईत गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दरसा मेळाव्यात बोलत होते.
शिंदे म्हणाले, "अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कुणी केले? बाळासाहेब म्हणाले होते, मला एक दिवस पंतप्रधान बनवा, मी राममंदिर बांधेन आणि काश्मीरचे 370 कलम हटवेन. कुणी हटवलं. त्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात? अरे मोदीजींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, त्यांच्यावर टीका करत आहात?"
"मी आपल्याला सांगतो, झोपडपट्टी विकास, 40 लाख लोकांना घरे देण्याचे स्वप्न बाळासाहेबांचे होते. माझ्याकडे गृहनिर्माण खाते आहे. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द देतो. तुम्ही एका तरी गिरणी कामगाराला घर दिलं? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 12 हजार लोकांना घर दिलंय. आमचं महायुती सरकार एक लाख गिरणी कामगारांना घरं दिल्या शिवाय राहणार नाही," असे आश्वासनही यावेळी शिंदे यांनी दिले.
संघाचं कौतुक, नाव न घेता ठाकरेंना टोला -
शिंदे पुढे म्हणाले, म्हणून मी आपल्याला एकच सांगतो. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. जे संघाचे लोक आहेत, जेव्हा संकट, आपत्ती येते, तेव्हा मदतीसाठी धाऊन जातात. संकटात धाऊन जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाले आहेत. एका समर्पित भावाने त्यांनी या देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त, देशभक्त आरएसएसवरही टीका करण्याचं काम तुम्ही करत आहात. तुम्ही कसले हिंदूत्ववादी?"
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली आहेत. 100 वर्ष हे थोडे थोडके वर्ष नाहीत. राष्ट्र भक्ती, देश भक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या शताब्दीनिमित, शिवसेनेच्या वतीने मी त्यांचे अभिनंद करतो. त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी शिवसेना देखील ज्वलंत हिंदूत्ववादी पक्ष आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.