'आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही'; नागपूर हिंसाचारानंतर नितेश राणेंनी काय दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:52 IST2025-03-18T14:47:19+5:302025-03-18T14:52:17+5:30

Nagpur violence: नागपूरमध्ये सोमवारी रात्री दंगल घडली. या घटनेबद्दल नितेश राणे यांनी भाष्य केले. 

'We as a government will not remain silent'; What warning did Nitesh Rane give on Nagpur riots? | 'आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही'; नागपूर हिंसाचारानंतर नितेश राणेंनी काय दिला इशारा?

'आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही'; नागपूर हिंसाचारानंतर नितेश राणेंनी काय दिला इशारा?

Nagpur aurangzeb news: नागपूरमधील हिंसाचाराचे राजकीय पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल निवेदन केल्यानंतर कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही भाष्य केले. आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही. हे पूर्वनियोजित होतं, असा वास येतोय, असे ते म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानभवनात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, "नागपूरच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन केले आहे. त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे. सकाळी बजरंग दल, विहिंप आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होत्या. दुपारी तो विषय मिटलेला. मग संध्याकाळी काही लोक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले."

काहीही घडवणं या राज्यात सोप्पं राहिलेलं नाहीये -नितेश राणे

"या सगळ्या घटना बघितल्यावर हे सगळं पूर्वनियोजित होतं, असा वास येतोय. काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या. इथे दंगल घडवायचीच आहे, अशी काही लोकांची तयारी होती का? त्याबद्दल चौकशी होणार. तुम्ही या राज्यात तुम्ही काहीही घडवणं आता सोप्पं राहिलेलं नाहीये. पोलीस शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होते, त्यांच्यावर हल्ला करण्याचं कारण काय? कुऱ्हाडीने हल्ला केला", असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला. 

"हल्ला केल्यावर आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही. पाकिस्तानचा अब्बा आठवेल, अशी कारवाई आता होणार आहे. आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण, हे आंदोलन कुठल्या प्रकारचं? ही हिंमत तोंडण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार करेल", असे नितेश राणे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल राणे म्हणाले...

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ते म्हणाले, "गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय. पहिलं कार्ड मुख्यमंत्र्यांनाच देणार ना?" मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. त्याबद्दल राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्कील उत्तर दिले. ते म्हणाले, "हो... फार, म्हणजे हातात हात घेऊन हसले. मुख्यमंत्र्यांची लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेंचं नाव आहे. माझे मुख्यमंत्री मला काय बोलले याची चिंता तुम्ही करू नका", असे नितेश राणे म्हणाले.  
 

Web Title: 'We as a government will not remain silent'; What warning did Nitesh Rane give on Nagpur riots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.