"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:57 IST2025-07-23T09:55:41+5:302025-07-23T09:57:24+5:30
फडणवीस यांची भाजपामधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे असं कौतुक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले होते.

"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुकमध्ये फडणवीसांचं कौतुक करणारी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी दिली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी फडणवीसांच्या ५५ व्या वाढदिवशी महाराष्ट्र नायक नावाचे एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केले. त्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत आल्यास विचार करू असं म्हटले होते. त्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. फडणवीसांनीही आम्ही शत्रू नाही, वैचारिक विरोधक आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या कौतुकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, मी त्यांच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे. महाराष्ट्रात आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत. कुणीच कुणाचा शत्रू नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आभार व्यक्त करतो. तर शरद पवारांचा मोठेपणा आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी माझ्याबद्दल विधान करणे हे माझ्यासाठी अतिशय मोलाचं आहे असं सांगत फडणवीसांनी शरद पवारांचेही आभार मानले आहेत.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे, शरद पवार?
फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसे काय नाकारता येईल? त्यांच्या कामाचा झपाटा उरक पाहिला की, मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो. आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. विविध विषयांची उत्तम जाण, प्रशासनावरील मजबूत पकड, आधुनिकतेची कास धरणारा नेता असं कौतुक शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले आहे.
तर देवेंद्र फडणवीस एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यांची समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ, राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. त्यांचा अभ्यासू स्वभाव, कायदेशीर आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळे ठरवते. फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची भाजपामधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे असं कौतुक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले होते.