'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:05 IST2025-08-08T18:04:30+5:302025-08-08T18:05:30+5:30
Devendra Fadnavis on Bogus Voters: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांतील घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis on Rahul Gandhi bogus voters Allegations: बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. तर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आम्हालाही ते मान्य आहे. आमची इतक्या वर्षापासून ते सांगत आहोत, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोजेक्टच्या मॉनिटरिंग वॉररुमबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भूमिका मांडली.
राहुल गांधींची स्क्रिप्ट सलीम-जावेद यांनी लिहिलेली
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, अलिकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम-जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून एक स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडत आहेत. याच्याने मनोरंजनापलिकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ नाहीये. सगळ्या गोष्टी कपोकल्पित ते मांडत आहेत."
मतदार याद्यांमध्ये घोळ आम्हालाही मान्य...
"सगळ्यात महत्त्वाचं की, ते एकीकडे म्हणतात, 'मतदार याद्यांमध्ये घोळ आहे.' आम्हालाही मान्य आहे. आम्ही तर इतक्या वर्षांपासून सांगतोय. आमची मागणी होती की, मतदार यांद्याचे सर्वसमावेश पु्र्नपडताळणी करा. आता निवडणूक आयोग म्हणत आहे की, आम्ही सर्वसमावेश पडताळणी करायला तयार आहोत", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं. तर राहुल गांधी म्हणतात की, सर्वसमावेश पडताळणी करू नका. मग त्यांना नेमकं हवं काय आहे? त्यांना सर्वसमावेश पडताळणीही माहिती नाहीये आणि मतदारयाद्यातील अडचणीही माहिती नाहीये", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
"त्यांना केवळ आपल्या हरण्याकरिता काहीतरी कारण शोधून काढायचं आहे. ते कारण त्यांनी शोधून काढलेलं आहे", अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.