८४ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Updated: April 28, 2016 03:29 IST2016-04-28T03:29:06+5:302016-04-28T03:29:06+5:30
पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो.

८४ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
पेण : पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो. तीन महिने विकत पाणी नेऊन अत्यंत हालअपेष्टात दिवस काढावे लागतात.
मात्र तरीही प्रशासनाकडून तोकडी उपाययोजना के ली जाते. आजघडीला तीव्र पाणीटंचाई भासत असतानाही पेणची ८४ गावे तहानलेली असताना मात्र केवळ पाच टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
पाणी टंचाईची ही समस्या गेली दहा - बारा वर्षांपासूनची. मात्र पाणी टंचाई सुरु झाली की दरवर्षी जिल्हा प्रशासनाची लगबग वाढते. टंचाई निवारणाचे आराखडे तयार होतात. तातडीच्या निधीची मागणी केली जाते, उपाययोजनांचे कागद आढावा बैठकीतून फिरु लागतात. आढावा घेणारी यंत्रणाही सक्रिय होते. जनतेला पाणी देण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होतो. उन्हाळा संपला की पाऊस आल्यावर फायली कपाट बंद होतात, प्रत्यक्षात या निवारणातून जनतेपर्यंत पाणी किती पोहचते हे मात्र समजणे कठीण आहे. पेणची ८४ गावे तहानलेली टँकर मात्र पाच कशी तहान भागणार. पाणीटंचाईची दाहकता वाढली असताना त्यावरील उपाययोजना तोकड्या ठरत आहेत.
पेणचा खारेपाट पाण्यावाचून शापित जीवन जगतोय. अनेकांनी पीकअप टेम्पो चालकांशी भाडेकरार करुन १ पीम्प प्लास्टीकचा ७० रुपये प्रमाणे पेण नगर परिषदेच्या इमारती जवळील टँकर भरण्याच्या जागेवरुन टेम्पो चालक गावकऱ्यांना पाणी नेत आहेत. पेण पंचायत समिती प्रशासनाने १० टँकरची मागणी केली असताना शासकीय ३ हजार लिटर क्षमतेचे २ टँकर, १० हजार लिटर क्षमतेचे २ टँकर आणि १२ हजार लिटर क्षमतेचा एक असे एकूण खाजगी ३ टँकर जमेस धरुन याच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे. एक टँकर चालक दिवसात दोन याप्रमाणे १० फेऱ्या होतात. शासकीय टँकरच्या ३ फेऱ्या अशा प्रकार १२ फेऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था सुरु आहे. मात्र टँकर पाणी साठवण टाकीची क्षमता कमी असल्याने गावाला पाणी पुरु शकत नाही.
गेल्या दशभराच्या अनुभवातून प्रशासकीय यंत्रणेला शहानपण सूचत नाही. टंचाई निवारण आराखड्यातील गावे दरवर्षी तीच असतात. अनेकदा त्यांची संख्या वाढते मात्र कमी होत नाही. सरकारने या प्रश्नी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)