बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यास दिला होता नकार; के.पी रघुवंशींचा दावा, कुणाचा आला होता फोन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:48 IST2026-02-28T14:48:25+5:302026-02-28T14:48:53+5:30
के.पी रघुवंशी यांना २०१० साली त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली केले होते.

बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यास दिला होता नकार; के.पी रघुवंशींचा दावा, कुणाचा आला होता फोन?
मुंबई - पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर जवळपास १ दशकांनी महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख के.पी रघुवंशी यांनी मोठा खुलासा केला आहे. रघुवंशी यांच्या काळात त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आरएसएसचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांच्यासह बड्या लोकांवर अटकेसाठी दबाव आणला होता असं त्यांनी म्हटलं आहे.
PTI च्या माहितीनुसार, या दाव्यांबाबत पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी लिहिलेल्या ऑथराइज्ड बायोग्राफी ट्रबलशूटर यात सविस्तर लिहण्यात आले आहे. हे पुस्तक याच आठवड्यात मुंबईत प्रकाशित झाले. या पुस्तकात म्हटलंय की, के.पी रघुवंशी यांना त्या काळात यूपीए सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्यांचा फोन आला होता. ज्यात २००८ च्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात इंद्रेश कुमार यांना अटक करण्यास सांगितले होते. त्यानंतर रघुवंशी यांनी मंत्र्यांना स्पष्टपणे असं करण्यास नकार दिला होता. कुठलेही ठोस पुरावे नसताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकत नाही असं रघुवंशी यांनी मंत्र्यांना सांगितले होते.
याच पुस्तकात एका जुन्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ मंत्र्याने १९९३ साली मुंबईत दंगलीच्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. के.पी रघुवंशी यांनी त्यांच्या मागणीचा विरोध केला होता. के.पी रघुवंशी यांना २०१० साली त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली केले होते. त्यांची बदली कथितपणे दबावांना झुगारल्यामुळे करण्यात आल्याचा दावा पुस्तकात केला आहे. मात्र या पुस्तकात थेट कनेक्शनबाबत कुठलेही डॉक्युमेंट्री प्रूफ दिले नाहीत.
या पुस्तक प्रकाशनावेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी होते. ज्यात माजी महासंचालक ए.एन रॉय यांचाही समावेश होता. त्यांनी के.पी रघुवंशी यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रसिद्ध केले. या कार्यक्रमाला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, माजी सीबीआय संचालक सुबोध जैस्वाल, माजी डीजीपी रश्मी शुक्ला, सध्याचे एटीएस प्रमुख नवल बजाज हजर होते. के. पी रघुवंशी २०१५ साली महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या डायरेक्टर जनरलपदावरून निवृत्त झाले होते. ते सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सच्या विजिलेंस युनिटचे प्रमुख आहेत.