महाराष्ट्रात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:53 IST2020-10-13T02:47:18+5:302020-10-13T06:53:57+5:30
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील लांजा १२०, राजापूर १००, देवगड, वैभववाडी ७०, दोडामार्ग, कणकवली, वेंगुर्ला ६० मिमी पावसाची नोंद झाली.

महाराष्ट्रात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. त्यामुळ सध्या पूर्व किनारपट्टीसह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. येत्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्य3ाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील लांजा १२०, राजापूर १००, देवगड, वैभववाडी ७०, दोडामार्ग, कणकवली, वेंगुर्ला ६० मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात जत १४०, विटा ९०, कडेगाव ८०, पंढरपूर, शेवगाव ७० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील सेलू १२०, घनसावंगी, मंठा, परतूर ८०, कळमनुरी, शिरुर कासार ७० मिमी पाऊस झाला. विदर्भातील मंगळुरपीर ८०, दारव्हा ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
पावसाचा अंदाज
१३ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१५ ऑक्टोबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.