कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:05 IST2025-12-24T06:04:56+5:302025-12-24T06:05:11+5:30
खंडणीला अडसर ठरल्यानेच केली हत्या; पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार

कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यभरात गाजलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील वाल्मीक कराडसह सातही आरोपींवर बीड येथील विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने मंगळवारी दोषारोप निश्चित केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
बीड जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी ‘फॉरेन्सिककडे असलेल्या लॅपटॉपमधील डेटाची प्रत मिळेपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये’ आणि ‘चार्ज फ्रेम करण्यापूर्वी अतिरिक्त पुरावा देण्यात यावा,’ अशी मागणी बचाव पक्षाने केली. तसेच आरोपी प्रतीक घुले याच्या नवीन वकिलाने पेन ड्राइव्हमधील माहिती पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. वारंवार वकील बदलणे आणि वेळकाढू धोरण अवलंबिण्यावरून न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘प्रत्येक तारखेला असे व्हायला नको. वारंवार वकील बदलून तीच ती कारणे दिली जात आहेत,’ अशा शब्दांत न्यायालयाने आरोपींना सुनावले.
सर्व आरोपींनी आरोप नाकारल्यामुळे आता या प्रकरणाची नियमित सुनावणी आणि साक्षीदारांच्या साक्षी घेण्याची प्रक्रिया ८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले
मोक्का न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी ‘तुम्हाला तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का?’ असे सर्व आरोपींना विचारले, तेव्हा मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सर्व सातही आरोपींनी ‘आरोप मान्य नसल्याचे’ सांगितले. यादरम्यान, आरोपी वाल्मीक कराड याने त्याचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्या. पाटवदकर यांनी आरोपी कराड यास केवळ फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये उत्तर देण्यास सांगितले.
सात आरोपींवर काय आहेत आरोप? : खंडणी मागणे, खुनाचा कट रचणे, खून करणे, धमकावणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, पुरावे नष्ट करणे, मोक्का कायद्यांतर्गत संघटित गुन्हेगारी करणे.
‘आरोप निश्चित झाल्यामुळे चाप बसला’
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, न्यायालयाने वाल्मीक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी आजही पुन्हा आरोपनिश्चितीची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला. खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन म्हणजेच उशीर करणे आणि खटला उलथवून लावणे, असे प्रयत्न होते, त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे चाप बसलेला आहे.