एसटीच्या ई-बसला चार महिन्यांची प्रतीक्षा; पहिल्या टप्यात एकूण ५० ई-बस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 07:59 PM2020-02-17T19:59:50+5:302020-02-17T20:07:53+5:30

ई-बसचे तिकीट दर शिवनेरीपेक्षा कमी

Waiting for four months for ST's department e-bus | एसटीच्या ई-बसला चार महिन्यांची प्रतीक्षा; पहिल्या टप्यात एकूण ५० ई-बस

एसटीच्या ई-बसला चार महिन्यांची प्रतीक्षा; पहिल्या टप्यात एकूण ५० ई-बस

Next
ठळक मुद्देपुणे, कोल्हापुर, सोलापुर व नाशिक हे मार्गांवर ई-बस सोडण्याचे नियोजनमागील वर्षी जून महिन्यात मुंबईत ई-बसची घोषणा करून ‘शिवाई’ असे केले नामकरणपहिल्या टप्यातील एकूण ५० ई-बसपैकी पुण्याला सर्वाधिक २५ बस मिळणार

पुणे : ईलेक्ट्रिक बसचे मोठ्या दिमाखात लोकार्पण केल्यानंतर एसटी महामंडळाची बस सात महिन्यांनंतरही मार्गावर येऊ शकलेली नाही. त्यासाठी प्रवाशांना आणखी चार महिन्याच्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्यातील एकूण ५० ई-बसपैकी पुण्याला सर्वाधिक २५ बस मिळणार आहेत. पुणे, कोल्हापुर, सोलापुर व नाशिक हे मार्गांवर ई-बस सोडण्याचे नियोजन आहे. 
मागील वर्षी जून महिन्यात मुंबईत ई-बसची घोषणा करून ‘शिवाई’ असे नामकरण केले. त्यानंतर काही महिन्यांनी खासगी ई-बसची प्रत्यक्ष मुंबई-पुणे मार्गावर चाचणी घेण्यास सुरूवात झाली. पण या चाचणीला विलंब झाला. काही दिवसांपुर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) या बसला हिरवा कंदील दाखविला. पण अद्याप चार्जिंग स्टेशनची उभारणीच झाली नसल्याने या बस प्रत्यक्ष मार्गावर धावू शकत नाहीत. एसटीने पुण्यातील स्वारगेट, नाशिक, सोलापुर व कोल्हापुर याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पुण्याला २५ बस मिळणार असल्याने येथील चार्जिंग स्टेशन जास्त क्षमतेचे असणार आहे. तर उर्वरित तीन शहरातील स्टेशनची क्षमता तुलनेने कमी असेल. या स्टेशनची उभारणी झाल्याशिवाय बस मार्गावर येणार नाहीत. एकीकडे घोषणा करून आठ महिने झाले तरी एसटीची ई-बस मार्गावर येत नसली तरी खासगी ई-बस धावू लागली आहे. 
याबाबत नुकतीच पुण्यात चारही विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम पुढील तीन महिन्यांत पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात स्वारगेट येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ३३ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी स्टेशनच्या नियोजित जागेपर्यंत आणवी लागणार आहे. मार्केटयार्ड येथून ही वाहिनी जमिनीखालून आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून महावितरणच्या अधिकृत ठेकेदाराला काम दिले जाणार आहे. याप्रक्रियेत तीन महिने जाणार आहे. विद्युत वाहिनीचे काम पुर्ण झाल्यानंतर चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होईल. त्यामुळे एसटीने जून महिन्यात ई-बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती विभागीय वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.  
.........
ई-बसचे तिकीट दर शिवनेरीपेक्षा कमी
एसटीच्या ताफ्यात येणारी ई-बस वातानुकूलित व आरामदायी असणार आहे. सध्या एसटीकडे शिवशाही व शिवनेरी या वातानुकूलित बस आहेत. दोन्ही बसचे तिकीट दर वेगवेगळे आहेत. आता ‘शिवाई’ बसचे तिकीट दरही वेगळे राहणार आहेत. शिवशाहीपेक्षा जास्त पण शिवनेरीपेक्षा कमी असे तिकीट दर प्रस्तावित आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १२५ ई-बस आहेत. पण या बसचे तिकीट सर्वसाधारण बसच्या तिकीट दराएवढेच आहेत. त्यामुळे या बस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Waiting for four months for ST's department e-bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.