महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:36 IST2025-10-16T06:35:35+5:302025-10-16T06:36:09+5:30
Maharashtra Politics: निवडणूक आयोगाचा सर्व्हर खासगी व्यक्तीच्या हाती; विरोधकांचा आरोप, ‘मतदार यादी सुधारा; मगच निवडणुका घ्या,’ विरोधी पक्षांची आयोगाकडे मागणी

महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मतदार यादीत गैरसोयीची नावे काढली जातात. यादीतील नावाबाबतचा गोंधळ समोर आला तर काही तासांतच ती नावे गायब केली जातात. विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाला काहीच माहीत नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरा कुणी खासगी व्यक्ती चालवत आहे, असा गंभीर आरोप महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांनी केला. यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी ठाम भूमिका या पक्षांनी बुधवारीही मांडली.
विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम व राज्य निवडणूक
आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन मतदार यादीतील घोळांबाबतचे अनेक पुरावे यावेळी विरोधकांनी सादर केले. नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता या महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह नोंदवले गेले. १२ ऑगस्टला दुपारी तीन वाजता आमच्या कार्यकर्त्यांनी तपासले तेव्हा ती नावे वेबसाइटवर होती; पण सहा वाजता ती नावे हटविण्यात आली. ही नावे कुणी काढली, हे फोटो एकाच महिलेचे आहेत का, याची पडताळणी होण्याच्या आत ती कशी काढली गेली, असे प्रश्न आयोगाला विचारण्यात आले. मात्र त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते. याचाच अर्थ निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसराच चालवत असल्याचा गंभीर आरोप विरोध पक्षाच्या नेत्यांनी केला.
विरोधकांनी कायदा समजून घ्यावा : देवेंद्र फडणवीस
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी घेऊन भेटत आहेत. या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विरोधकांनी किमान कायदा तरी समजून घ्यावा,’ असा टोला मारला आहे. सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधकांनी आयोगाकडे तक्रार केली. मात्र कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे करावी, हे माहिती नसल्यामुळे त्यांचा ‘फियास्को’ झाला. शरद पवारांना हे सर्व माहित असल्यामुळे ते बुधवारी विरोधकांबरोबर गेले नाहीत. विरोधक गोंधळात असल्यामुळे नॅरेटिव्ह सेट करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
निवडणूक नि:पक्षपातीपणे झाली पाहिजे, नाही तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. भाजपचे काही लोक मतदार यादीशी खेळताहेत. याबाबत विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी आयोगाला पत्र दिले होते; पण त्यावर काहीही झाले नाही.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेनाविधानसभा निवडणुकीत एका पक्षाने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या, जी नावे सोयीची आहेत, ती हिरव्या पेनाने व गैरसोयीचे लाल पेनाने अधोरेखित करा. आम्ही आयोगाकडे तक्रार केली होती.
- जयंत पाटील, नेते, शरद पवार गटमतदार कसा गोपनीय असू शकतो? मतदार कोण आहेत हे आम्हाला कळायला नको? आयोग ही लपवाछपवी का करतो आहे? जिल्हा परिषदेच्या २०२२च्या याद्या फोटो आणि नावासकट आहेत, आता याद्या आल्या आहेत, त्यांत फक्त नावे आहेत.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेराजुरात मतदार नोंदणीबाबत भाजप नेत्याच्या मोबाइलवर ओटीपी आला, तो कसा? तक्रारीनंतरही कारवाई नाही. आयोगाच्या वेबसाइटचे काम भाजपचा पदाधिकारी देवांग दवे करत होता.
- विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते