'संवेदनशीलपणाचे दर्शन'! विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून शेतकरी मोर्चा रात्रीच आझाद मैदानात धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 00:11 IST2018-03-11T21:56:31+5:302018-03-12T00:11:54+5:30
आपल्या मागण्यांसाठी 165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांनी संवेदनशीलपणाचे दर्शन घडवले आहे

'संवेदनशीलपणाचे दर्शन'! विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून शेतकरी मोर्चा रात्रीच आझाद मैदानात धडकणार
मुंबई - आपल्या मागण्यांसाठी 165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांनी संवेदनशीलपणाचे दर्शन घडवले आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. मोर्चामुळं विद्यार्थांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे.
रविवारी शेतक-यांचे ‘लाल वादळ’ मुंबईत दाखल झाले. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. आज रात्री मोर्चेकरी सोमय्या मैदानात विश्रांती घेणार होते. आणि उद्या विधानभवनावर धडकणार होते, मात्र संवेदनशीलपणाचे दर्शन घडवत विद्यार्थांना त्रास नको म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानावर धडकणार आहेत.
शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. आज रात्रीच किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी यांनी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं. मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.
उद्या सोमवारी विधानभवनावर हा मोर्चा धडकण्याआधीच सरकारने मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षानेही पाठींबा दिला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या वतीने किसान मोर्चातील शेतकऱ्यांची विक्रोळीत भेट घेत स्वागत केलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असं आश्वासन महाजनांनी मोर्चेकऱ्यांना दिलं.
लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी यावेळी व्यक्त केला.
विधान भवनाला घेराव -
नाशिकमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतक-यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.
मनसेचा पाठिंबा, राज ठाकरे घेणार भेट -
काल डाव्या पक्षांच्या या मोर्चाला पाठिंबा देण्याचं शिवसेना आणि मनसेने जाहीर केल्यानंतर आज संध्याकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे शेतकरी मोर्चाच्यामध्ये सामील झालेल्या शेतक-यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सोमैय्या मैदान, चुनाभट्टी-सायन येथे राज ठाकरे त्यांची भेट घेतील. हा महामोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर मनसेकडून चेंबूर येथे मोर्चाचे स्वागत होणार आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस -
शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.
सरकारची भूमिका -
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून उद्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहतील असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.