Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:37 IST2025-12-19T11:36:03+5:302025-12-19T11:37:17+5:30
Pune Foreign National Teaches Traffic Rules: फूटपाथचा वापर दुचाकी चालवण्यासाठी करणाऱ्या पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना अखेर परदेशी नागरिकांनी आरसा दाखवला.

Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या फूटपाथचा वापर दुचाकी चालवण्यासाठी करणाऱ्या पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना अखेर परदेशी नागरिकांनी आरसा दाखवला. पिंपळे निलख परिसरातील गजबजलेल्या रक्षक चौकात काही परदेशी नागरिकांनी चक्क फूटपाथवर उभे राहून बेशिस्त दुचाकीस्वारांना रोखले आणि त्यांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पिंपळे निलख येथील रक्षक चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वार सर्रासपणे पादचाऱ्यांच्या फूटपाथवरून गाड्या चालवतात. ही बाब तिथे उपस्थित असलेल्या काही परदेशी नागरिकांच्या लक्षात आली. या बेकायदेशीर कृत्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, या नागरिकांनी पुढाकार घेण्याचे ठरवले. त्यांनी फूटपाथवरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवले आणि अतिशय शांतपणे त्यांना समजावून सांगितले की, "फूटपाथ हे केवळ चालणाऱ्या लोकांसाठी आहेत, गाड्या चालवण्यासाठी नाहीत."
परदेशी नागरिकांची गांधीगिरी
या नागरिकांनी कोणताही गोंधळ न घालता किंवा कोणाशीही वाद न घालता केवळ फूटपाथवर उभे राहून दुचाकीस्वारांना रोखले. यामुळे दुचाकीस्वारांना नाईलाजाने गाड्या रस्त्यावर उतराव्या लागल्या. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दाखवलेली ही तत्परता पाहून रस्त्यावरील इतर नागरिकही अवाक झाले.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
या घटनेनंतर इंटरनेटवर एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. अनेक नेटकऱ्यांनी परदेशी नागरिकांच्या या कृतीचे कौतुक केले आहे, तर काहींनी स्थानिक प्रशासनावर टीका केली. भारतीयांना शिस्त शिकवण्यासाठी परदेशातील लोकांना पुढाकार घ्यावा लागतो, हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली. रस्ते सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची आहे, असे दुसऱ्या व्यक्तीने म्हटले. तर, फूटपाथवरून गाड्या जाऊ नयेत म्हणून तिथे लोखंडी खांब लावले पाहिजे, अशी मागणी एका व्यक्तीने केली आहे.