विनायक राऊत यांनी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला, उपजिल्हाप्रमुखानेच केला खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:32 IST2025-12-29T17:29:31+5:302025-12-29T17:32:32+5:30
उद्धवसेनेतील गटातटाचे राजकारण चव्हाट्यावर

विनायक राऊत यांनी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला, उपजिल्हाप्रमुखानेच केला खळबळजनक आरोप
खेड : विनायक राऊत हे अळंबीसारखे उगवणारे माणूस आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्याऐवजी उद्धवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा खळबळजनक आराेप उद्धवसेनेचे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख सचिन आंब्रे यांनी केला आहे. त्यामुळे आता उद्धवसेनेतील गटातटाचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात उद्धवसेनेला आलेल्या अपयशानंतर पक्षातील अंतर्गत कलह आता समाेर येऊ लागला आहे. विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील अंतर्गत संघर्ष ऐन निवडणुकीच्या काळात समाेर आला हाेता. त्यानंतर उत्तर रत्नागिरीचे उपजिल्हाप्रमुख सचिन आंब्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना थेट माजी खासदार व पक्ष नेते विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत आराेप केल्याने वादाची ठिणगी पडली आहे.
जिल्हाप्रमुख आंब्रे यांनी सांगितले की, रत्नागिरीतील जे नगरसेवक निवडून आले, ते विनायक राऊत यांच्यामुळे नाही तर आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वामुळे निवडून आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. विनायक राऊत हे अळंबीसारखे उगवणारे नेते आहेत. त्यांनी उद्धवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नसल्याचा आराेप त्यांनी केला.
आंब्रे यांनी केलेल्या या थेट आरोपांमुळे उद्धवसेनेतील अंतर्गत फूट अधिकच गडद झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
मैदान साेडून पळ काढला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना, विनायक राऊत कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यांनी राऊत यांच्यावर मैदान सोडून पळ काढल्याचा आरोपही केला आहे.
पद गेले तरी चालेल
माझं पद गेलं तरी चालेल, पण विनायक राऊत यांच्या कृत्यांचे पाढे मी वाचणारच, असा इशाराही आंब्रे यांनी दिला आहे. पक्षाशी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले.