शरद पवारांच्या 'यंग ब्रिगेड'मध्ये विजयसिंह पंडितांचा समावेश ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:40 PM2019-09-18T12:40:33+5:302019-09-18T12:44:26+5:30

विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी अनेकदा संघर्ष केला आहे.

VijaySingh Pandit in Sharad Pawar's 'Young Brigade'! | शरद पवारांच्या 'यंग ब्रिगेड'मध्ये विजयसिंह पंडितांचा समावेश ?

शरद पवारांच्या 'यंग ब्रिगेड'मध्ये विजयसिंह पंडितांचा समावेश ?

googlenewsNext

मुंबई - मागील पाच वर्षाच्या काळात तब्बल ३० हून अधिक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आला आहे. परंतु, यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दंड थोपटले असून यावेळी विधानसभेला तरुणांना अधिक संधी देण्याची योजना त्यांनी केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीत यंग ब्रिगेड उभारण्यावर पवारांकडून भर देण्यात येत आहे. या यंग ब्रिगेडमध्ये गेवराईचे इच्छूक उमेदवार विजयसिंह पंडित यांचा समावेश झाल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीत अंतर्गत फेररचना सुरू झाली आहे.

निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षातील नकारात्मक बाबी दूर करण्यासाठी पवार खुद्द मैदानात उतरले आहे. मंगळवारपासून शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात त्यांनी मंगळवारी गेवराई येथे विजयसिंह पंडित यांच्या 'शिवछत्र' निवासस्थानी मुक्काम केला. त्यामुळे पवारांच्या यंग ब्रिगेडमध्ये विजयसिंह पंडित यांचा सामावेश झाला, या चर्चेला बळ मिळाले आहे. विधानसभेत जास्तीत जास्त तरुणांना तिकीट देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस आहे. यात विजयसिंह पंडितांचा नंबर लागणार, अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी अनेकदा संघर्ष केला आहे. शिवाय मतदार संघातील जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळे गेवराईत भाजप आमदार लक्ष्मण पवार यांना टक्कर देण्यासाठी विजयसिंह पंडित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: VijaySingh Pandit in Sharad Pawar's 'Young Brigade'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.