जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:01 IST2025-07-17T14:55:55+5:302025-07-17T15:01:10+5:30
Jan Surakshan Bill: खरे तर त्या दिवशी सभात्याग करणे गरजेचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
Jan Surakshan Bill: अलीकडेच जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. राज्यपालांनी आता यावर स्वाक्षरी केली की, याचे रुपांतर कायद्यात होईल. या विधेयकावर हजारो हरकरी, सूचना आल्या होत्या. त्यामुळे यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यावर जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आले. परंतु, काँग्रेस नेत्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध न केल्याबाबत हायकमांड नाराज असून, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांना नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधिमंडळ परिसरात विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस विजय वडेट्टीवार यांना पक्षाच्या हायकमांडकडून आलेल्या नोटिसीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, हायकमांडची कुठलीही नोटीस मला आलेली नाही. हे विधेयक विधानसभेत मांडले गेले, त्यादिवशी नव्हतो. बँकेची निवडणूक होती. त्यामुळे जनसुरक्षा विधेयक आले, तेव्हा मला हजर राहता आले नाही.
विरोधकांनी सभात्याग करायला हवा होता
सभागृहात काँग्रेस नेत्यांनी योग्य बाजू मांडली नाही, असा सूर उमटत आहे. परंतु, ते योग्य नाही. काँग्रेस नेत्यांनी योग्य पद्धतीने बाजू मांडली. त्या दिवशीचे प्रोसिडिंग आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत. प्रदेशाध्यक्षांनाही त्याची एक प्रत देणार आहोत. खरे तर विरोधकांनी त्या दिवशी सभात्याग करणे गरजेचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. तोंड दाबण्याचे काम सरकार करत आहे. प्रदेशाध्यक्षांनी एक नोट मला दिली होती. प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते की, या विधेयकाला कसा विरोध करायचा. बाकी आमदारांकडेही ती नोट होती. पण, सभागृहामध्ये हे विधेयक आले तेव्हा सरकारने सांगितले की, समितीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे फार चर्चा करता येणार नाही. विधेयकाला जोरदार विरोध करायला हवा होता. महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधणे गरजेचे होते. मात्र ते झाले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, जनसुरक्षा विधेयक मांडले, त्यावेळी आम्ही सभागृहात होतो. विजय वड्डेटीवार यांच्याशी माझे बोलणे होईल. आता माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. जनसुरक्षा विधेयक अचानक सभागृहात आले. त्यामुळे ते उपस्थित नसतील. जनसुरक्षा विधेयकाबाबत आम्ही नेमकी काय बाजू मांडली? हे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवू. या विधेयकाच्या समितीमध्ये सूचना दिल्या होत्या. आम्ही जी काय माहिती आहे ती पक्षाला कळवू, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.