"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:31 IST2025-09-17T14:30:48+5:302025-09-17T14:31:38+5:30
Vijay Wadettiwar News: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.

"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी
मुंबई - राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.
राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. तसेच बँकेकडून शेतकऱ्यांची होणारी वसुली थांबवावी, पिक विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे बळीराजा आस लावून बसला होता की त्याला काही मदत मिळेल पण या बैठकीत देखील शेतकऱ्यांसाठी काही निर्णय झाला नाही.शेतकरी निराश झाला आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. राज्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अस वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.