विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:51 IST2025-07-25T08:51:27+5:302025-07-25T08:51:39+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत.

विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत. रेल्वेने केलेल्या विशेष गाड्यांची अवस्थाही सामान्य गाड्यांप्रमाणेच झाल्याने चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे. महामुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने गणपतीकरिता गावी पोहोचायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)वरून सावंतवाडी, रत्नागिरी, मडगाव या मार्गांवर ८ एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. याद्वारे १९४ दुहेरी फेऱ्या नियोजित केल्या आहेत. मुंबईमधून जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू केले. परंतु, या सर्वच गाड्यांचे कन्फर्म तिकीट आरक्षण सुरू होताच फुल्ल झाले आहे. २२ ते २६ ऑगस्टपर्यंतची ऑनलाइन तिकीट विक्री पहिल्या तीन मिनिटांमध्ये फुल्ल झाली. दुसरीकडे तिकीट खिडक्यांवरही तासन् तास थांबूनही तिकीट मिळत नसल्याचे चाकरमानी हवालदिल झाले. त्यामुळे रेल्वेने आणखी विशेष गाड्यांची घोषणा करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.
...तर सर्वांना कन्फर्म तिकीट मिळेल
रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली. परंतु, त्यांनी महिनाभराच्या अंतराने रोज एक दिवसाचे बुकिंग खुले केले असते तर सर्वांना तिकीट काढणे शक्य झाले असते. उदा. २४ जुलै रोजी २३ ऑगस्टचे बुकिंग खुले करणे. सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग एकाच दिवशी खुले केल्याने गोंधळ उडाला असून, सर्व गाड्या रिग्रेट झाल्या असल्याचे अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे सचिव अक्षय महापदी यांचे म्हणणे आहे.
या गाड्यांचे आरक्षण फुल्ल
सीएसएमटी - सावंतवाडी २ गाड्या २४ ते २६ ऑगस्ट
सीएसएमटी - रत्नागिरी २४ ते २६ ऑगस्ट
एलटीटी- सावंतवाडी ३ गाड्या २३ ते २६ ऑगस्ट
एलटीटी - मडगाव २ गाड्या २३ ते २६ ऑगस्ट
हजारो चाकरमानी वेटिंगवर
एलटीटी - सावंतवाडी गाडीचे २२ तारखेचे वेटींग गुरुवारी रात्री ९ वाजता तपासले असता २४४ इतके होते. तर सीएसएमटी- सावंतवाडी गाडीचे २२ आणि २३ तारखेचे वेटींग त्याच वेळेत २३० पेक्षा अधिक होते.
पुन्हा क्षमतेपेक्षा जास्त वेटिंग
रेल्वेगाड्यांच्या १ जुलैनंतर आरक्षित होणाऱ्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनाने मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे गाडीतील एकूण आसनक्षमतेपेक्षा केवळ २५ टक्केच वेटिंग तिकिटांची विक्री करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांपैकी एलटीटी - सावंतवाडी गाडीचे वेटिंग तिकीट ११०१ असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तिकीट कन्फर्म नाही झाल्यास याचा भुर्दंड मात्र प्रवाशांवर लादला जाणार आहे.