टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:18 IST2025-07-16T12:16:28+5:302025-07-16T12:18:13+5:30
विरोधी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते

टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
मुंबई - पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधकांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली होती. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. या मुद्द्याचा निषेध करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक टॉवेल बनियान घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, हारून खान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यासह इतर आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आमदारांनी संजय गायकवाड यांच्या हातात बॉक्सर घातलेला फोटोसह पोस्टर झळकावले. त्यावर महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो असं छापले होते. विरोधी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते तेव्हा मंत्री गिरीश महाजन आले. त्यांनी विरोधी आमदारांचा हा वेष पाहून हसत हसत विधान भवनात गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादाही तिथून आतमध्ये गेले त्यांनाही हसू आवरले नाही.
Mumbai, Maharashtra: Opposition leaders staged a protest on the steps of the Maharashtra Vidhan Bhavan against the indecent behavior of an MLA from the treasury benches pic.twitter.com/AjwdAh8pZR
— IANS (@ians_india) July 16, 2025
काय आहे प्रकरण?
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली होती. जेवण निकृष्ट दिल्याचा आरोप करत आमदार गायकवाड यांनी बनियन आणि टॉवेलवर कॅन्टीनमध्ये येत कर्मचाऱ्यांना जाब विचारला. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मॅनेजरला ठोसे, कानाखाली मारली. संजय गायकवाड यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आणि त्यामुळे सरकारची कोंडी करण्याची विरोधकांना आयती संधी सापडली.
शिंदेसेनेच्या आमदाराचे हे कृत्य पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय या आमदारावर योग्य ती कारवाई करावी अशी शिफारस त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे केली. या प्रकरणी पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संजय गायकवाड यांना त्यांच्या कृत्यावरून समज दिली होती. नेत्यांनी कार्यकर्ता असल्यासारखे वागावे. मीदेखील कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. कमी बोला पण जास्त काम करा असं सांगत मला कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशाराच पक्षातील वादग्रस्त नेत्यांना दिला होता.